
>> विठ्ठल देवकाते
कोलकात्यामध्ये जन्मलेला नॉर्मन प्रीतचर्ड हा माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला. अँग्लो इंडियन वडिल आणि ब्रिटिश आईच्या पोटी जन्मलेल्या नॉर्मनला फुटबॉल खेळ आवडायचा. मात्र, ऑक्सफर्ड विद्यापीठातील धावण्याच्या शर्यतीत त्याने सहजपणे भाग घेतला.
नॉर्मन हा 100, 200 मीटर धावणे आणि 60, 110 आणि 200 मीटर अडथळा शर्यतींत प्रथम आला. याच काळात म्हणजे 1900 साली फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये कसलीशी स्पर्धा होती. मित्रांच्या आग्रहाखातर तो या स्पर्धेत सहभागी झाला. मग त्याला समजले की, या स्पर्धेला ऑलिम्पिक म्हणतात व देश-विदेशातील खेळाडू यात सहभागी होतात.
नॉर्मनने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत 22.8 सेकंद वेळ नोंदवीत दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर हर्डल्स ही अडथळ्याची शर्यतही 26.6 सेकंदांत पूर्ण करून नॉर्मनने आणखी एका रौप्यपदकाची कमाई केली. इतर तीन शर्यतींत मात्र त्याला यश संपादन करता आले नाही. यावेळी हिंदुस्थानमध्ये स्वातंत्र्याची लढाई सुरू होती.
हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटना नावाची गोष्टही त्यावेळी अस्तित्वात नव्हती. मात्र, त्यावेळी ऑलिम्पिक ही खुली स्पर्धा असल्याने कुठल्याही खेळाडूला थेट स्पर्धेत सहभागी होता येत होते. त्यामुळेच नॉर्मन प्रीतचर्डने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले अन् अचानकपणे हिंदुस्थानही पदकतालिकेत झळकला.
नॉर्मन हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील शिक्षण पूर्ण करून पुन्हा हिंदुस्थानात परतला. तो काही काळ हिंदुस्थान फुटबॉल संघटनेचा पदाधिकारीही होता. मात्र, हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा पेटल्याने नॉर्मन प्रीतचर्ड अमेरिकेला निघून गेला. त्यामुळे हिंदुस्थानला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या या अॅथलेटिक्सपटूचे नाव दुर्दैवाने मायदेशातील लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही.