सर्वाधिक घोटाळे असलेल्या एसआरएमध्ये व्हिजिलन्स विभागच नाही; सर्वांनाच मोकळे रान

मुंबई महापालिका, म्हाडा, एसटी अशा सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या संस्थांमधील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिजिलन्स (दक्षता) विभाग असतो. पण सर्वाधिक घोटाळे असलेल्या एसआरए प्राधिकरणामध्ये दक्षता विभागाच नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एसआरएमधील सर्वच स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय कार्यालयांमध्ये आणि महामंडळातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षता विभाग स्थापन करण्यात येतात. मुंबई महापालिकेत तर दोन व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहेत. व्हिजिलन्स आणि टाओ व्हिजिलन्स असे दोन विभाग आहेत. त्यावर सहआयुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. म्हाडा आणि एसटी महामंडळातही दक्षता विभागावर आयपीएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येतो. अर्थात दक्षता विभाग स्थापन झाला तरी गैरप्रकाराला आळा बसतो असे समजण्याचे कारण नाही याकडे मंत्रालयातील अधिकारी लक्ष वेधतात. म्हाडा-सिडकोत दक्षता अधिकारी आहेत, पण गैरप्रकारांना आळा बसलेला नाही. सिडकोत मध्यंतरी काही अधिकाऱयांना अँटी करप्शन विभागाने पकडले होते. पण सिडकोत असलेल्या दक्षता विभागाला या कारवाईची कुणकुणही नव्हती. पण तरीही दक्षता विभाग असल्यामुळे कर्मचारी वचकून असतात.

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी एसआरएची स्थापना झाली, पण अजूनही या प्राधिकरणात दक्षता विभाग नाही. दक्षता विभागाची तरतूद या प्राधिकरणात नाही. पण मुंबई महापालिका किंवा म्हाडासारख्या नियोजन प्राधिकरणात दक्षता विभागाची स्थापना होते तर मग एसआरएसारख्या प्राधिकरणात दक्षता विभाग का नाही? असा प्रश्न गृहनिर्माण विभागातील अधिकारीच विचारत आहेत.

एसआरएमध्ये सभापती
म्हाडाप्रमाणे एसआरएमध्ये दक्षता विभाग स्थापन करण्याबरोबरच एसआरएमध्ये सभापती आणि सदस्य नियुक्ती करण्याची सूचनाही आता पुढे आली आहे. कारण एसआरएचे अधिकारी सर्वसामान्यांना जुमानत नाहीत. त्यांच्या विरोधात तक्रारीसाठी दक्षता विभागही नाही. सभापती व प्राधिकरणावर सदस्य नियुक्त केले तर निदान सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि सभापती व सदस्य म्हणून राजकीय नेत्यांचीही वर्णी लागेल. त्यामुळे नाराजांची नाराजीही दूर होईल असा दुहेरी फायदा होईल, अशी सूचना गृहनिर्माण विभागातील अधिकारी करतात. गृहनिर्माणमंत्री हे एसआरए प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्यामार्फत सभापतीपदाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना अधिकाऱयांकडून होत आहे.