10 किलोमीटर पायपिटीनंतरच कुंभस्नान, प्रयागराजमध्ये भाविकांचा कोंडमारा; शहरात वाहनांना बंदी

माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराजमध्ये पुन्हा भाविकांचा महासागर उसळला असून त्यांचा अक्षरशः कोंडमारा झाला आहे. आधीच रस्ते जाम होऊन लाखो भाविक वाहतुककोंडीत अडकून पडल्याने त्यात आणखी भर पडू नये म्हणून संपूर्ण प्रयागराज शहरच नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री प्रयागराजमधील परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होता कामा नये असे आदेश पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, कल्पवास करणाऱ्या भाविकांनाही वाहनाने शहरात प्रवेश करता येणार नाही.

नवीन वाहतूक योजना लागू करण्यात आली असून भाविकांना त्यांची वाहने शहराबाहेर पार्क करावी लागतील. तर ट्रेनने येणाऱ्या भाविकांना रेल्वे स्टेशन परिसरात उतरून 8 ते 10 किलोमीटर पायी चालत संगमतटापर्यंत यावे लागणार आहे. माघी पौर्णिमेला अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरही बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत.

पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत नो व्हेईकल

पहाटे चार वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहनांना प्रयागराजमध्ये बंदी असणार आहे. केवळ आपत्कालीन आणि जीवनावश्यक सेवांसाठीच्या वाहनांना तसेच प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या वाहनांना शहरात प्रवेश असेल असे राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. माघी पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

चार पिढय़ांसह अंबानींचे गंगास्नान

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आज कुटुंबीयांसह त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन, मुले आकाश आणि अनंत, सुना श्लोका आणि राधिका, नातवंडे पृथ्वी आणि वेदा, मुकेश अंबानी यांची बहिण दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी यांनी पवित्र स्नान केले. अंबानी कुटुंबातील 4 पिढय़ांनी एकाचवेळी संगमावर पवित्र स्नान केले आणि गंगा मातेची पूजा केली.

कुठल्या स्टेशनपासून किती चालावे लागणार

प्रयागराज जंक्शन- 12 किलोमीटर, संगम प्रयाग स्टेशन- 6, प्रयाग स्टेशन-7, दारागंज स्टेशन-3 , रामबाग स्टेशन-8, नैनी स्टेशन-12, सुभेदारगंज स्टेशन-15, फाफभाऊ स्टेशन-8, छिक्की स्टेशन-16