गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या शेकडो प्रवाशांनी दोन ते तीन महिने आधीच संपूर्ण एसटी गाड्यांचे रिझर्वेशन केले असताना गेल्या दोन दिवसांत संपाचे कारण देत एसटी महामंडळाने अचानक गाड्या देण्यास नकार दिल्याने मुंबई सेंट्रल आगार आणि रेसकोर्सजवळ शेकडो प्रवाशांचे हाल झाले. ही गंभीर बाब लक्षात येताच शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी अक्षरशः मध्यरात्री प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेत चहा, पाणी, नाष्टा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या.
आरक्षित केलेल्या गाड्या एसटी मुंबई सेंट्रल आगारात काल सायंकाळी आल्याच नाहीत. रेसकोर्स येथून आयोजित उपक्रमाच्या ठिकाणीही हीच स्थिती होती. यावेळी आगार प्रशासनाकडे विचारणा करणाऱ्या गणेशभक्तांना उडवाउडवीची उत्तरे देत संपामुळे गाड्या देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.
गाड्या आता सकाळीच मिळतील असे उत्तर यावेळी देण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रवाशांना मनस्ताप झाला. यामुळे आगारात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी महामंडळाशी संपर्क साधत रात्री 3 वाजता अनेक गाड्या उपलब्ध करू दिल्या. यामुळे शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.