पेडल अन् स्पोक व्हीलही नाही, ‘ही’ इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर धावते 100 किमी; किती आहे किंमत?

ऑटो एक्स्पो 2025 यावेळी सर्वात जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शित होत आहेत. यात अनेक नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसत आहेत. याशिवाय काही स्टार्ट-अप्स देखील या एक्स्पोमध्ये आले आहेत, ज्यांनी त्यांच्या उत्पादनांसह बऱ्याच लोकांना आकर्षित केलं. असाच एक ब्रँड आहे, ज्याचं नाव आहे Helen Bikes. या कंपनीच्या इलेक्ट्रिक सायकलने ऑटो एक्स्पोमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या इलेक्ट्रिक सायकलमध्ये काय आहे खास?

कंपनीचं म्हणणं आहे की, ही जगातील पहिली ऑल इलेक्ट्रिक हबलेस सायकल आहे. या सायकलला रिम-स्पोक्स नाही आणि चालवायला पेडलचीही गरज नाही. हेलेन नावाची ही सायकल सध्या एक कॉन्सेप्ट म्हणून दाखवली जात आहे. कॉन्सेप्ट मॉडेलपासून उत्पादनापर्यंत जाण्यासाठी सुमारे 6-9 महिने लागू शकतात, ही एक हबलेस सायकल आहे, याचा अर्थ सायकलच्या चाक आणि फ्रेममध्येच इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. या सायकलच्या फ्रेमवरच बॅटरी ठेवली जाते.

सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

या सायकलच्या फ्रेममध्ये 1.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. जे पूर्ण चार्ज केल्यावर 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. ही इलेक्ट्रिक सायकल तीन तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. सायकलचे एकूण वजन 60 ते 70 किलो आहे. दरम्यान, या सायकलच्या किमतीबद्दल कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच कंपनी याबद्दल अधिक माहिती जाहीर करू शकते.