अफगाणिस्तानात महिलांसोबत भेदभाव नाही, तालिबानने हॉलिवूड अभिनेत्रीचा दावा फेटाळला

अफगाणिस्तानमधील महिलांसोबत नेहमीच दुजाभाव केला जातो. तेथे महिलांपेक्षा मांजरीला जास्त स्वातंत्र्य आहे, असा गंभीर आरोप हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांनी केला होता. अभिनेत्रींच्या या आरोपाला आता तालिबानने प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानात महिलांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही. असे आरोप करणे मूर्खपणाचे आहे, असे तालिबानचे प्रवत्ते हमदुल्लाह फितरत यांनी म्हटले. अफगाणिस्तानमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही. परंतु काही महिलांना तालिबानविरोधात अपप्रचार करण्याची सवय आहे, असेही ते म्हणाले. याआधी मेरिल स्ट्रीप यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण केले होते. अफगाणिस्तानात महिलांपेक्षा मांजर आणि खार यांना जास्त स्वातंत्र्य आहे. अफगाणिस्तानमध्ये प्राणीही मोकळे फिरू शकतात, अफगाण महिलांना लपून राहावे लागते. हे खूप विचित्र आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.