NEET UG ची फेर परीक्षा होणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी NEET UG फेर परीक्षा घेण्याची आणि गेल्या महिन्यात जाहीर केलेला निकाल रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.

निकाल सुनावताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, ‘सध्याच्या टप्प्यावर, परीक्षेचे निकाल खराब झाल्याचे किंवा परीक्षा आयोजित करताना पद्धतशीर उल्लंघन झाले आहे हे दर्शविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत’.

सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, परीक्षेच्या दिवशी म्हणजे 5 मे रोजी पेपर फुटला होता. हा पेपर हजारीबागमध्ये फुटला होता आणि तो पाटण्याला पाठवण्यात आला होता, असे तपास यंत्रणेने सांगितले.

‘आरोपींनी 5 मे रोजी सकाळी 8.02 वाजता प्रवेश करण्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मागील दरवाजाचा वापर केला, जिथे प्रश्नपत्रिका बंद होत्या. मागील दरवाजा केंद्र अधीक्षकांनी मुद्दाम उघडा ठेवला होता. सकाळी 9.23 वाजता ते नियंत्रण कक्षातून बाहेर आले. त्यांनी ताबडतोब प्रश्न सोडवणाऱ्यांकडे पाठवले’, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मागील वर्षांच्या तुलनेत वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ नाही हे सिद्ध करण्यासाठी केंद्रनिहाय डेटा शेअर केला.