
जातनिहाय जनगणनेच्या मुद्दय़ावरून आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंत्री अनुराग ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली. ज्यांची जात कुणाला माहीत नाही ते जातनिहाय जनगणनेबद्दल बोलतात. काही लोक ओबीसींबद्दल केवळ बोलतात. त्यांच्यासाठी ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन, अशी टीका अनुराग ठाकूर केली. त्यांच्या टीकेला राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले. जो कुणी सभागृहात दलितांचे मुद्दे मांडतो त्याला शिवीगाळ ऐकावी लागते. मी या शिव्या आनंदाने स्वीकारेन; परंतु अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, आता आमचेही एकच ध्येय आहे. सरकारला जातनिहाय जनगणना करायला लावणारच, असे राहुल गांधी ठामपणे म्हणाले.
असत्याला पाय नसतात. ते काँग्रेस पक्षाच्या खांद्यावर बसून फिरत आहे. मदारीच्या खांद्यावर माकड असते तसेच काँग्रेसच्या खांद्यावर असत्य आहे. राहुल गांधींच्या खांद्यावर असत्याचे गाठोडे आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना अनुराग ठाकूर यांना उत्तर देण्याची परवानगी दिली. राहुल गांधी म्हणाले, अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली. माझा अपमान केला; परंतु मला त्यांच्याकडून माफी नको. मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही. जातनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची मागणी असून आम्ही सरकारला ही जनगणना करायला लावणारच. त्यासाठी मला कितीही शिवीगाळ सहन करावी लागली तरी चालेल, असे राहुल गांधी म्हणाले.
सभागृहात खासदाराची जात विचारणे चुकीचे -अखिलेश
राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांची बोलती बंद केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभापती जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. त्याचवेळी अखिलेश यादव यांनी खडाजंगीत उडी घेतली. ते म्हणाले, सभागृहात कोणाचीही जात विचारली जाते का? एखादा सदस्य दुसऱ्या सदस्याला त्याची जात कशी काय विचारू शकतो. त्यावर जगदंबिका पाल म्हणाले. कोणताही सदस्य सभागृहात कोणाचीही जात विचारू शकत नाही.