पुरुष शिंपी महिलांचे माप घेऊ शकणार नाहीत, उत्तर प्रदेशात महिला आयोगाचा आदेश

पुरुष शिंपी महिलांचे मोजमाप करू शकणार नाहीत. तसेच जिम आणि योगा सेंटरमध्ये महिला प्रशिक्षकांचीच नियुक्ती करण्यात यावी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होतेय की नाही यावर नजर ठेवण्यात येईल, असा आदेश महिला आयोगाने दिला आहे. कानपूर एकता हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाने ही कडक कारवाई केली आहे. पार्लरमध्ये मुलींच्या मेकअप आणि ड्रेससाठी एक महिला असावी. महिलांसाठी खास कपडे विकणाऱ्या दुकानांमध्ये महिला कर्मचाऱयांनाही कामावर ठेवावे. तसेच कोचिंग सेंटर्सवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे असे आयोगाने म्हटले आहे. 28 ऑक्टोबरला महिला आयोगाची बैठक झाली. त्या वेळी याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या मुद्द्यांची कडक अंमलबजावणी होणार

जिम व योगा सेंटरमध्ये येणाऱयांचे ओळखपत्र तपासणार, स्कूल बसमध्ये महिला सुरक्षा कर्मचारी अनिवार्य, नाट्यकला केंद्रातही महिला शिक्षकांचीच नियुक्ती, महिलांसाठी विशेष कपडे विकणाऱया दुकानांमध्येही महिला कर्मचारीच असावेत, कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही आणि वॉशरुमची व्यवस्था असावी.  

काय आहे कानपूर हत्या प्रकरण

व्यापारी राहुल गुप्ता यांची पत्नी एकता हिचा मृतदेह 27 ऑक्टोबर रोजी कानपूरच्या डीएम आवास कॅम्पसमध्ये पुरलेला आढळला होता. 4 महिन्यांपूर्वी एका जिम ट्रेनरने महिलेचे अपहरण केले होते.