पाणी पट्टीत वाढ नाही, मुंबईकरांना दिलासा

मुंबईच्या पाणीपट्टीत कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला दररोज मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. निवासी ग्राहकांकडून प्रती एक हजार लिटर पाण्यासाठी 5.46 पैसे आकारले जातात. तर एक हजार लिटर पाणी शुद्धीकरणासाठी मुंबई महापालिका 26 रुपये खर्च करते. त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणा-या मुंबई महापालिकेला 120 किलोमीटर अंतरावरुन पाणी वाहून आणण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. या खर्चाचा ताळमेळ बसावा यासाठी 2012 मध्ये दरवर्षी पाणीपट्टीत 8 टक्क्यांपर्यंत वाढ करता येईल, अशी मंजुरी स्थायी समितीने दिली आहे. त्यामुळे वर्षभरात झालेल्या खर्चाच्या आधारावर पाणीपट्टीत किती टक्के वाढ करता येईल, ही सूचना पालिकेच्या ऑडिट विभागाकडून करण्यात येते. त्यानंतर जल विभाग प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतो.