कन्फर्म तिकिटाशिवाय नो एण्ट्री! रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी नवा नियम

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंगवर असेल किंवा ज्यांच्याकडे तिकीट नसेल त्यांना बाहेर वेटिंग हॉलमध्ये थांबावे लागेल. हा नियम देशातील 60 प्रमुख रेल्वे स्थानकांवर लागू केला जाईल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि उच्चपदस्थ रेल्वे अधिकारी यांच्यातील बैठकीनंतर रेल्वे प्लॅटफॉर्मच्या नियमांबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रवाशांची जास्त गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर सहमती झाली. रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 60 मोठय़ा रेल्वे स्थानकांवर हा नियम लागू केला जाईल. प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीत आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणासारख्या स्टेशनवर हा नियम आधीच लागू आहे.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी

अलीकडेच दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 18 जण मृत्युमुखी पडले. सुट्टय़ा आणि सणांच्या काळात काही रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी असते. बरेच लोक त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर येतात आणि यामुळे गर्दी वाढते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी रोखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी देशातील मोठय़ा शहरांमधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर लवकरच नवा नियम लागू केला जाईल. या नवीन नियमांमुळे अनपेक्षित गर्दी टाळता येईल आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल.

काय आहे नियम

जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असेल तर थेट रेल्वे स्थानकांत प्रवेश करून तुम्ही ट्रेनची वाट पाहू शकता.

जर तिकीत वेटिंगवर असेल तर स्थानकाबाहेरील वेटिंग हॉलमध्ये थांबावे लागेल. जर तुमचे तिकीट जनरल डब्याचे असेल तर ट्रेन येण्यावेळीच स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.