उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत आवाज उठवला. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील पाच काँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ उद्या संभल येथे जाणार आहे. शिष्टमंडळात नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांचाही समावेश असणार आहे. हे शिष्टमंडळ या वेळी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे. परंतु राहुल गांधी यांनाही वेशीवरच रोखले जाईल असे पोलीस अधीक्षक कृष्णकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
संभल येथे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कलम 163 अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरच्या कुणालाही संभलमध्ये येण्याची परवानगी नाही. जर कुणी येण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना नोटीस देण्यात येईल असेही कृष्ण कुमार यांनी सांगितले.
पाकिस्तानी बनावटीची काडतुसे जप्त
संभल हिंसाचाराचा तपास सध्या सुरू आहे. फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे. या तपासादरम्यान पाकिस्तानी बनावटीची सहा काडतुसे संभल येथून हस्तगत करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याशिवाय अमेरिकन बनावटीचे एक निकामी झालेले काडतुसही मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस अधीक्षक किशन कुमार विष्णोई यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.