स्कर्ट, बर्मुडा घातल्यास मंदिरात नो एन्ट्री! मथुरेतील बांकेबिहारी मंदिराचा निर्णय

मथुरा  येथील प्रसिद्ध वृंदावन ठाकूर बांकेबिहारी मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱया भक्तांनी स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स घालून आल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार नाही, असा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. नववर्षात या मंदिरात देवदर्शनासाठी मोठी गर्दी होते. या वर्षीसुद्धा मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने काही नियम केले आहेत.

मंदिरातील येणाऱया भाविकांनी मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, बर्मुडा, अर्धी पँट आणि नाईट सूट यांसारखे पोशाख घालून मंदिराते येणे टाळावे, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. या कपडय़ांमुळे पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा कमी होते, असेही मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. मंदिराकडे जाणाऱया रस्त्यांवर आणि प्रसारमाध्यमांद्वारे ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाला भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल. या उपक्रमाचा उद्देश पूज्य स्थळाची सांस्कृतिक प्रतिष्ठा राखणे हा आहे. काही भक्त, विशेषतः प्रदेशाबाहेरील पर्यटक, अनेकदा जीन्स आणि टी-शर्टसारख्या अनौपचारिक पोशाखात येतात. ते सामान्य पर्यटकांचे कपडे असले तरी ते मंदिराच्या आदर आणि श्रद्धेच्या परंपरेशी जुळत नाहीत, असे बांकेबिहारी मंदिर व्यवस्थापक मुनीश शर्मा यांनी म्हटले आहे.