मुंबईकरांवर पालिकेकडून लावण्यात येणाऱ्या प्रस्तावित ‘कचऱ्यावरील करा’चा निर्णय आता लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण कचऱ्यावर कर आकारण्यासंदर्भात आज पालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोणताही निर्णय किंवा चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मुंबईकरांवर ‘कचरा कराचा’ बोजा पडलाच तर तो निवडणुका झाल्यानंतरच पडेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत सद्यस्थितीत दररोज 6 हजार मेट्रिक टनांवर कचरा जमा होतो. हा कचरा घनकचरा विभागाकडून जमा करून डंपिंग ग्राऊंडवर नेला जातो. यामध्ये सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट आणि पुनर्वापराची प्रक्रियाही करण्यात येते. मात्र घनकचरा विभागाला कचरा विल्हेवाटीतून काहीच उत्पन्न मिळत नाही. मुंबईजवळ असलेल्या ठाणे, विरार पालिकांमध्ये मात्र कचरा उचलण्याचे शुल्क घेतले जाते. त्यामुळे लवकरच मालमत्ता कराच्या ‘युजर टॅक्स’मध्ये कचरा उचलण्यासाठी शुल्क घेण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. यामुळे पालिकेला वर्षाला किमान दहा कोटी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र पालिकेने याबाबत हालचाली सुरू केल्याच्या बातम्या येताच सर्वच राजकीय पक्षांकडून कचरा कराला विरोध करण्यात येत आहे. पालिकेने कचरा कर लादण्याचा प्रयत्न केल्यास जोरदार आंदोलनाचा इशाराही अनेक पक्ष-संघटनांकडून देण्यात आला आहे.
मुंबईतील कचऱ्याची स्थिती
मुंबईत पावसाळ्यापर्यंत दररोज 6850 मेट्रिक टन कचरा जमा होत होता. मात्र दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात पावसाळ्यानंतर तब्बल 650 मेट्रिक टनांची घट झाली असून आता दररोजच्या कचऱ्याचे प्रमाण 6200 मेट्रिक टनांवर आले आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिका सोसायट्यांमध्येच कचरा वर्गीकरण, कचरा विल्हेवाट, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या वापरापासून पुनर्वापराने उपयोगी वस्तू बनवण्याबाबत उपायोजना करीत आहे.