मालगुंड पुस्तकांचे गाव, परंतु रत्नागिरीत आता पुस्तक विक्रीचे एकही दालन नाही; ग्रंथस्नेह बंद होताच चोखंदळ वाचकांसमोर पेच

दुर्गेश आखाडे,रत्नागिरी

साहित्यिकांची आणि साहित्यप्रेमींची भूमी अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. एकीकडे पुस्तकांचे गाव उभारले जात असताना रत्नागिरीत मात्र सध्या पुस्तकाचे दुकान नसल्याची साहित्यप्रेमींसाठी दुर्दैवी गोष्ट पुढे आली आहे. गेली अनेक वर्षे वाचकांची सेवा करणारे ग्रंथस्नेह हे पुस्तकांचे दुकान बंद झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड हे पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मालगुंडमधील 30 आणि गणपतीपुळ्यातील पाच अशा एकूण 35 घरांमध्ये पुस्तक संग्रहालये निर्माण केली जाणार आहेत. मालगुंड हे पुस्तकाचे गाव म्हणून उभारले जात असताना रत्नागिरी शहर आणि तालुक्यात मात्र पुस्तकांचे वितरण करणारे दुकान सुरू नाही ही दुर्दैवी बाब पुढे आली आहे. अनेक वेळा वाचकांना पुस्तके विकत हवी असतात. पुस्तकांची गरज भागवण्याचे काम सुमारे 30 वर्षे रत्नागिरीच्या ग्रंथस्नेह या पुस्तकांच्या दुकानाने केले होते. श्रीकृष्ण साबणे यांनी जयस्तंभ येथे हे ग्रंथस्नेह पुस्तकांचे दुकान सुरू केले. अनेक वाचकांना ग्रंथस्नेहमध्ये पुस्तके उपलब्ध होत होती. तसेच स्थानिक लेखकांसाठीही ग्रंथ विक्रीचे दालन उपलब्ध झाले होते. त्यानंतर 10 वर्षांपूर्वी मुंबईच्या मॅजेस्टीकने रत्नागिरीत पुस्तक विक्रीचे दालन सुरू केले होते. कालांतराने मॅजेस्टीकचे रत्नागिरीतील दुकान बंद झाले.

मॅजेस्टीकमुळे वाचकांना अतिशय दुर्मिळ पुस्तकेही सहज उपलब्ध होत होती. मॅजेस्टीकचे दालन रत्नागिरीत सुरू होणे ही रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी घटना होती. मॅजेस्टीक बंद झाल्यानंतर वाचकांचा संपूर्ण भार हा ग्रंथस्नेहवर होता. वाचकांची ही भूक ग्रंथस्नेह भागवत होते. मात्र गतवर्षी श्रीकृष्ण साबणे यांनी वाढत्या वयोमानाप्रमाणे या व्यवसायातून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर जयस्तंभ येथील ग्रंथस्नेह हे पुस्तकांचे दुकान बंद झाले. सध्या रत्नागिरीत एखाद्या स्टॉलवर किरकोळ प्रमाणात पुस्तकांची विक्री होते. त्याशिवाय रत्नागिरीत पुस्तक विक्रीचे दालन किंवा दुकान नाही. वाचकांना आता रत्नागिरीत होणाऱ्या पुस्तक विक्री प्रदर्शनावरच अवलंबून रहावे लागते.

पुस्तक भेटी रखडल्या

अनेक जण वाढदिवसानिमित्त भेटवस्तूऐवजी पुस्तक संच भेट देतात. काही सत्कार सोहळ्यामध्ये पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबवला जातो. वाचनाची आवड लक्षात घेऊन मित्रमंडळींच्या गाठीभेटीत पुस्तक संच भेट दिला जातो. एखाद्या मित्राला पुस्तक संच भेट देण्याकरिता, पुस्तक खरेदीकरिता रत्नागिरीत स्वतंत्र दालन नाही. त्यामुळे चोखंदळ वाचकांना पुस्तक भेट देण्याच्या आवडीनिवडी जोपासता येत नाहीत.