बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, बातम्या हेतुपुरस्सर चालवल्या; सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांचा दावा

शेख हसिना यांचे सरकार कोसळल्यानंतर तेथील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेच नाहीत, असा दावा बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी आज केला. यासंदर्भातील बातम्या हेतुपुरस्सर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) डायरेक्टर जनरल मोहम्मद अश्रफउझझमन सिद्दिकी आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएएसएफ) दलजित सिंग चौधरी यांच्यातील उच्चस्तरीय बैठकीत अनेक नवीन मुद्दय़ांवर चर्चा झाली. चौधरी यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सिद्दिकी यांनी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी बांगलादेशने पावले उचलली असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही दलांची ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होती. वर्षातून दोनदा होणारी ही बैठक पुढे जुलै 2025 मध्ये ढाका येथे होईल. चौधरी यांनी अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे आरोप फेटाळताना आंतरराष्ट्रीय सीमेवरील त्यांच्या अधिकार क्षेत्रापासून आठ किमी अंतरावरील दुर्गापूजा मंदिरांना त्यांच्या दलाने वैयक्तिकरीत्या सुरक्षा कवच दिल्याचे उदाहरण दिले.

राजधानी दिल्लीत 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही देशांच्या सीमा दलांच्या प्रमुखांची 55वी बैठक झाली. बीजीबीचे सिद्दीकी हे त्यांच्या 12 अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह दिल्लीला आले. बैठकीच्या समारोपानंतर त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक यांबाबत भाष्य केले. बीएसएफ बांगलादेशला लागून असलेल्या पाच राज्यांमध्ये पसरलेल्या 4,096 किमी लांबीच्या सीमेचे रक्षण करते.

अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवली

चौधरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या 150 यार्ड परिसरात हिंदुस्थानकडून पुंपण घालण्यावर आमचा आक्षेप आहे. याबाबत संयुक्त तपासणी करण्याची विनंती केली आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांना मी अतिशयोक्ती म्हणेन. असे कोणतेच हल्ले झाले नाहीत. हिंदूंच्या प्रमुख उत्सवांपैकी एक दुर्गापूजा व्यवस्थित पार पडावा यासाठी बांगलादेशच्या कायदा अंमलबजावणी संस्थांना सरकारने अतिशय काटेकोरपणे काम करण्याचे आदेश दिले होते. ज्यांना धोका वाटतो अशा अल्पसंख्याकांच्या विनंतीनुसार त्यांना सुरक्षाही पुरवण्यात आली.

घुसखोरांना आळा घालण्यात यश 

ऑगस्ट 2024 पासून बांगलादेशातून हिंदुस्थानात बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांच्या घटना कमी झाल्या आहेत, असे दोन्ही सीमा दलाच्या प्रमुखांनी त्यासंदर्भातील प्रश्नावर सांगितले. बीएसएफचे चौधरी म्हणाले की, घुसखोरांना आळा घालण्यासाठी बीजीबीची आम्हाला चांगली मदत झाली. ते आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी मदत केली. ज्या काही समस्या आहेत त्या भविष्यात सुटतील, अशी आशा दोन्ही सीमा दलाच्या प्रमुखांनी व्यक्त केली. तसेच 1975 मध्ये झालेल्या हिंदुस्थान-बांगलादेश सीमा कराराच्या पुनर्रचना करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सिद्दिकी यांनी नमूद केले.