नवी मुंबईतून मुंबईत जाणाऱ्या नवी मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना अटल सेतूवरून प्रवास करता यावा यासाठी एनएमएमटीने दोन बसेसची विशेष सेवा आजपासून सुरू केली आहे. या दोन्ही बसेस अटल सेतूमार्गे नवी मुंबईतून मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहेत. एक बस नेरुळमधून तर दुसरी बस खारघरमधून सोडण्यात येणार आहे. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला तर अटल सेतू मार्गावरून बसेस वाढविण्याचे नियोजनही एनएमएमटीने केले आहे.
अटल सेतूचे उद्घाटन झाल्यानंतर या मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या बसेस एनएमएमटी प्रशासनाने सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. ही मागणी गांभीयनि घेऊन त्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. प्रवाशांच्या मागणीनुसार दोन बसेसची सेवा या मार्गावरून आजपासून सुरू करण्यात आली आहे. बस मार्ग क्रमांक 116 ची बस नेरुळ ते मंत्रालय व्हाया अटल सेतू मार्गाने धावणार आहे. त्यानंतर बस मार्ग क्रमांक 117 ची बस खारघर ते मंत्रालय दरम्यान अटल सेतू मार्गावरूनच जाणार आहे. या दोन्ही बसेसची सेवा सोमवार ते शनिवार अशी चालणार आहे.
बस क्रमांक 116 चा रूट
ही बस नेरुळमधून निघणार असून ती किल्ले गावठाण, मोठा उलवा, प्रभात हाईट्स, रामशेट ठाकूर स्टेडिअम, खारकोपर रेल्वे स्थानक मार्गान अटल सेतूवर जाणार आहे. त्यानंतर ही बस पुढे मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे. बसचा परतीचा मार्गही याच पद्धतीने असणार आहे.
117 क्रमांक बसचा मार्ग
ही बस खारघरमधून सुटणार आहे.
खारघरमधील उत्सव चौक, कळंबोली सर्कल, आसूड गाव आगार हायवे, पनवेल बस स्थानक, पळस्पे फाटा, करंजाडे फाटा, गव्हाण फाटा या मार्गावरून उलव्यात येणार आहे. त्यानंतर ही बस अटल सेतू मार्गावर प्रवेश करून पुढे मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे. या बसचा परतीचा प्रवासही याच मार्गावरून असणार आहे.
समुद्राच्या लाटांवरून वातानुकूलित प्रवास
या दोन्ही बसेस वातानुकूलित असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना समुद्राच्या लाटांचे सौंदर्य न्याहाळत गारेगार प्रवास करता येणार आहे. अटल सेतूवरून सुरू झालेल्या या बसेसमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.