लोकसभा निवडणुकीत देशात आतापर्यंत सहा टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. आता येत्या 1 जूनला सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. यामुळे निकाल काय लागणार? याची उत्सुकता वाढली आहे. अशातच आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.
चार जूनला नितीशकुमार हे मोठा निर्णय घेणार आहेत, असा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे. चार जूननंतर नितीशकुमार हे पक्ष वाचवण्यासाठी आणि मागासवर्गीयांसाठी कुठलाही राजकीय निर्णय घेऊ शकतात. नितीशकुमार हे काहीही करू शकतात. ते काहीतरी मोठा निर्णय घेणार आहेत, असा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे.
हे बिहार आहे; झारखंड किंवा दिल्ली नाही, एकदा हात लावून तर पहा! तेजस्वी यादव यांचा मोदींवर पलटवार
या वर्षाच्या सुरुवातीला जेडीयूचे नेते नितीशकुमार हे आरजेडी सोबतच्या आघाडीपासून वेगळे झाले होते. यामुळे बिहारमध्ये आरजेडी सत्तेबाहेर गेली. नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थानप केली. आता दोन्ही पक्ष मिळून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. अशातच तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्याबाबत मोठे विधान केल्याने ते पुन्हा तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बिहारमध्ये जंगलराज सुरू आहे. सतत हत्या होत आहेत. पाटण्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली. बिहारमध्ये कोणीस सुरक्षित नाही. हत्येतील दोषींना तातडीने अटक करा, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे. पाटणा विद्यापीठाच्या बी. एन. कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या लिंचिंग प्रकरणावरून तेजसी यादव आक्रमक झाले आहेत.