
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या मुद्द्यावरूनच माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. राबडीदेवी म्हणाल्या की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मानसिक संतुलन ढासळले असेल तर त्यांनी पायउतार व्हावे आणि आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवावे. त्यांच्या मुलाला ते जमले नाही तर त्यांनी खुर्ची दुसऱ्याच्या हाती द्यावी, असेही त्या म्हणाल्या आहेत.
राष्ट्रगीत सुरू असतानाच हातवारे करणे, इतरांशी बोलणे यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अडचणीत आले आहेत. त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून बिहार विधानसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी सभागृहाच्या आत आणि बाहेर पोस्टर लावून निदर्शने केली. कामकाज सुरू होण्यापूर्वी राजदने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नितीश कुमार यांचे मानसीक संतुलन ढासळले असल्याने त्यांनी खुर्ची सोडावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
या मुद्द्यावर तेजस्वी यादव म्हणाले की, ‘बिहारसाठी हा काळा दिवस होता. भारत मातेचा जयघोष करणारे भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री गायब आहेत. गुरुवारी आमच्या सर्वांच्या मान शरमेने खाली गेल्या. भारतीय राजकारणात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्र्यांची मानसीक संतुलन बिघडले असून, त्यांनी देशाची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले.