‘महिलेशी कसे बोलावे हे मुख्यमंत्री विसरले…’, आमदार रेखा देवी यांनी सुनावलं

nitish kumar rekha devi

बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीच्या महिला आमदार रेखा देवी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावर त्या म्हणाल्या की, ‘आपण सर्वांचे मुख्यमंत्री आहोत, एखाद्या महिलेशी बोलण्याची एक पद्धत असते, पण महिलेशी कसं बोलावं ही पद्धतच मुख्यमंत्री विसरले आहेत’.

आजतक या हिंदी खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आरजेडीच्या आमदार म्हणाल्या की, मुख्यमंत्री महिलांना सांगतात की त्यांना काही कळत नाही. स्त्री आली कशी? मुख्यमंत्र्यांनी महिलांचा अपमान करणं थांबवावं, असं आमचं म्हणणं आहे. महिलांना सन्मान द्या. प्रत्येक घरात स्त्री ही आई, सून, मुलगी, बहीण असते आणि हे असे बोलतात’.

मुख्यमंत्र्यांनी महिला आणि मुलींसाठी चालवेल्या योजनांसंदर्भात विचारले असता रेखा देवी म्हणाल्या, ‘मुलींना पुढे घेऊन जातात, पण मुलींचं काय होतं ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही. मुली कुठेतरी सुरक्षित आहेत का? मुख्यमंत्र्यांनी महिलांची माफी मागावी’.

काय म्हणाले नितीश कुमार?

नितीशकुमार बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधक आरक्षणाबाबत आंदोलन करत होते. नितीश आपल्या भाषणादरम्यान विरोधी आमदारांना संपूर्ण प्रकरण एकदा ऐकून घेण्याचं आवाहन करत होते. दरम्यान, आंदोलकर्त्या आरजेडी आमदार रेखा देवी यांच्यावर ते संतापले. मुख्यमंत्र्यांनी आरजेडी आमदाराला सांगितलं की, ‘ती महिला आहे, तिला काही कळत नाही’.

आरजेडीवर निशाणा साधत नितीश म्हणाले, ‘या लोकांनी आजवर कोणत्या महिलेला प्रमोट केलं आहे? त्यांना 2005 नंतरच प्रमोट करायला सुरुवात केली. म्हणूनच म्हणत आहे की, शांतपणे ऐका. आम्ही तर ऐकवणाच तुम्ही ऐकले नाही तर तो तुमचा दोष आहे.’