राजकीय रणनितीकार आणि नेते प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केल्याचा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला.
‘जन सुराज’ अभियानादरम्यान शुक्रवारी एका सभेला संबोधित करताना त्यांनी नितीश कुमार यांना धारेवर धरले. देशाची कमान नितीश कुमार यांच्या हातात असल्याचे माध्यमकर्मी काही दिवसांपूर्वी म्हणत असल्याचे आपण पाहिले असेल. नितीश कुमार यांच्याशिवाय सरकार बनणार नाही. एवढी ताकद त्यांच्याकडे आहे. मात्र शपथविधी सोहळ्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करत बिहारी जनतेची इज्जत विकली, असा घणाघात प्रशांत किशोर यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, या बदल्यात नितीश कुमार यांनी काय मागितले? बिहारच्या जनतेसाठी रोजगार मागितला नाही. बिहारच्या अनेक जिल्ह्यात साखर कारखाने सुरू व्हावेत, ही मागणीही केली नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचीही मागणी केली नाही. मग नक्की त्यांनी मागितले तरी काय असा विचार बिहारची जनता करत असेल? तर नितीश कुमार यांनी 2025 नंतरही मला मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवा आणि यासाठी भाजपने समर्थन द्यावे अशी मागणी केली. बिहारच्या जनतेची इज्जत त्यांनी मोदींच्या पायाशी ठेवली, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.