देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे उत्तर प्रदेशात होतात. दुसऱ्या क्रमांकवर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकवार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत अपघाती मृत्यूंवर चर्चा केली. त्यांनी गंभीरतेने घेतले आहे. इतरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरांमधील अपघाती मृत्यूंमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. बेंगळुरू दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. अपघात रोखण्यासाठी चांगले रस्ते आणि चांगली वाहनं महत्त्वाची आहेत. देशात 59 टक्के अपघात हे राष्ट्रीय महामार्गांवर होत आहेत. सदोष रस्ते या अपघातांना कारणीभूत असल्याची कुबली रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
लोकसभेत देशातील अपघात आणि रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. पंजाबच्या संगरूरमधील आम आदमी पार्टीचे खासदार गुरमित सिंग मीत हेयर यांनी प्रश्न उपस्थित केला. रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न त्यांनी केला होता. त्यावर नितीन गडकरी यांनी वरिल उत्तर दिले. जपान, स्वीडन, ऑस्ट्रेलियात अपघाती मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी एक टाईमलाईन आखली गेली. अशा प्रकारे देशात अपघाती मृत्युंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने काय पावले उचलली आहेत? असा आणखी एक प्रश्न गुरमित सिंग यांनी केला.
स्वीडनने रस्ते अपघाती मृत्यू शून्यावर आणले आहेत. बऱ्याच देशांनी हा विक्रम केला आहे. पण मी जेव्हा जागतिक परिषदांमध्ये जातो तेव्हा तोंड लपवावं लागतं. कारण सर्वांत वाईट रेकॉर्ड हा आपल्या देशाचा आहे. 2024 अखेरपर्यंत 50 टक्के अपघाती मृत्यू आणि अपघात आम्ही करू असं मी म्हटलं होतं. कमी झालेच नाहीत, उलट अपघात वाढले. हा एकच असा विषय आहे ज्यात आमच्या मंत्रालयाला यश आलेलं नाही. त्यामागे अनेक कारणं आहेत. जोपर्यंत समाज सहकार्य करत नाही, नागरिकांचं वर्तन बदलत नाही, कायद्याचा आदर वाटत नाही तोपर्यंत हे अवघड आहे. आम्ही असं काही टार्गेट ठेवलेलं नाही. पण कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.