
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास मला लाभला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनाप्रमुखांच्या स्वभावाचे काही किस्सेही त्यांनी उलगडून दाखवले.
ज्येष्ठ निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार आज ठाण्यात करण्यात आला. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आयेजित केलेल्या या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे उपस्थित होते. या वेळी बोलताना गडकरी यांनी सुधीर गाडगीळ यांच्या कार्याचा गौरव केला. मुलाखत घेताना ती सहज आणि मनमोकळी कशी होईल याचे कसब गाडगीळ यांना चांगले अवगत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना मी बांधकाम मंत्री म्हणून काम केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या जवळ जाण्याची संधी आणि भाग्य मला लाभले. पाण्यातल्या माशाचे अश्रू दिसत नाहीत, असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. बाळासाहेबांचे नेतृत्व कणखर असले तरी त्यांचे अंतर्मन हळवे होते, असेही गडकरी यांनी सांगितले.
छोटे पद मिळाले तरी वाटतं… साला मै तो साहब बन गया
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना चमकोगिरी करणाऱयांचे कान टोचले. ते म्हणाले, हल्ली कोणालाही छोटेसे पद जरी मिळाले तरी त्याला वाटते – साला मै तो साहब बन गया! एवढेच नाही तर काही जण स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स अगदी गळय़ात सोन्याचे हारही घालून मिरवतात. पण मी स्वतः या सर्व गोष्टींपासून अलिप्त असून पोस्टर्सवर एक रुपयाही खर्च केलेला नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.