एका वर्षात रस्ते अपघातात देशभरातील एकूण 1 लाख 68 हजार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. 2018 ते 2022 या काळात 7 लाख 77 हजार 423 लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला. 2022 मध्ये एकूण 4 लाख 61 हजार 312 अपघात झाले आहेत. अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात आढळलेल्या त्रुटींसाठी गडकरी यांनी चार कंत्राटदारांना जबाबदार धरले. तसेच 2022 मध्ये अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून या वर्षात अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या 4 लाख 43 हजार 366 एवढी आहे. अनेक प्रयत्न करूनही एका वर्षात 1.68 लाख मृत्यू झाले हे सांगताना दुःख होते. मृतांमध्ये 60 टक्के तरुण-तरुणींचा समावेश असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.