राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या अद्याप कायम आहे. एनसीआरमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा (ग्रॅप 4) लागू करण्यात आला आहे. येथील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. दिल्ली शहरात राहायला मला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे संसर्ग होतो, असे विधान गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांची यंदाही डोकेदुखी वाढवली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने 5 डिसेंबरपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
गडकरी म्हणाले की, प्रत्येक वेळी दिल्लीत येतो, तेव्हा इथे (दिल्ली) जाऊ की नको असा मनात विचार येतो. एवढे भयंकर प्रदूषण आहे. हिंदुस्थान 22 लाख कोटी रुपयांच्या जीवाश्म इंधनाची आयात करतो. हे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एक आव्हान आहे. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन दिल्यास आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो. दरम्यान, मंगळवारी हवेत थोडीफार सुधारणा झाल्याने दिल्लीकरांना दिलासा मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने येत्या काही दिवसांत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.