
गरीबांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला निधीची आवश्यकता असते आणि त्यासाठी कर लागतो. त्यामुळे वारंवार कर कपातीची मागणी करू नका, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगाशी संबंधित लोकांना केले. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी कर नसेल तर सरकार कल्याणकारी योजना कशा राबवेल? त्यामुळे जीएसटी आणि इतर करांमध्ये सतत कपात करण्याची मागणी करू नका, असे उद्गार काढले.
कर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जर कर कमी केले तर तुम्ही आणखी कपात करण्याची मागणी कराल. कारण हा मानवी स्वभाव आहे. आम्हाला कर आकारणे कमी करायचे आहे. पण कर आकारणीशिवाय सरकार कल्याणकारी योजना चालवूच शकत नाही. त्यामुळे सरकारलाही काही मर्यादा आहेत. श्रीमंत लोकांकडून कर घ्यायचा आणि गरीबांना फायदा द्यायचा हे सरकारचे व्हिजन आहे, असे गडकरी म्हणाले.