जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी प्रचंड मेहनतीने साकार केलेल्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओवर राज्य सरकारने अखेर कब्जा केला आहे. सध्या तरी हा स्टुडिओ फिल्मसिटीच्या ताब्यात देण्यात आला आहे. पण भविष्यात हा भव्यदिव्य स्टुडिओ सरकारच्या एखाद्या ‘लाडक्या मित्रा’च्या घशात घालण्याची भीती कलाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा एन.डी. स्टुडिओ म्हणजे कलाक्षेत्रात ‘मैलाचा दगड’ ठरला होता. नितीन देसाई यांनी 2005 मध्ये या स्टुडिओची उभारणी केली. सुमारे 52 एकर जागेवर हा स्टुडिओ उभारला. या स्टुडिओत हिंदी-मराठीसह हॉलीवूडच्या सिनेमांचे अतिभव्य सेट्स उभारले होते. अनेक सुपरहिट सिनेमांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले आहे. गडकिल्ले, राजवाडे, बंगले असे असंख्य सेट्स या स्टुडिओत उभारण्यात आले होते. अनेक पुरस्कार वितरण सोहळेही या स्टुडिओत झाले होते. एन.डी स्टुडिओ म्हणजे नितीन देसाईंचे दुसरे घरच होते. पण पुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नितीन देसाई यांनी याच स्टुडिओमध्ये त्यांची जीवनयात्रा संपवली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर कलाक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती.
एन. डी. स्टुडिओचा मुद्दा विधिमंडळातही गाजला होता. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईज फायनान्स कंपनीची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत तर भाजपचेच आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली होती एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेण्याची मागणी विधिमंडळात झाली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नितीन देसाई यांनी अत्यंत कष्टाने उभारलेला एन. डी. स्टुडिओ कोणाच्याही घशात जाणार नाही, असे सभागृहाला आश्वासन दिले होते.
- आता विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्य सरकारने एन.डी स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाने ताब्यात घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज एन.डी. स्टुडीओला भेट देऊन पाहणी केली. आता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन. डी. स्टुडिओचे कामकाज होणार आहे.
- राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला 14 नोव्हेंबर 2024 रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन. डी. स्टुडिओची दैनदिन कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहणार आहेत.