नितेश राणे, गीता जैन यांच्या बेताल बडबडण्याला चाप; याचिकाकर्त्यांना पुन्हा कोर्टात येण्यास हायकोर्टाने दिली मुभा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भडकावू विधाने करणाऱया भाजप आमदार नितेश राणे व गीता जैन यांच्याविरोधातील विविध याचिका मंगळवारी उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. संबंधित भाजप आमदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीतही भडकावू विधाने केल्यास याचिकाकर्त्यांनी पुन्हा न्यायालयात यावे, अशी मुभा न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली. हा निर्णय देत न्यायालयाने नितेश राणे, गीता जैन यांच्या बेताल बडबडण्याला लगाम लावला आहे.

नितेश राणे, गीता जैन, टी. राजा या भाजप आमदारांनी अनेक ठिकाणी भडकावू विधाने केली. त्याला आक्षेप घेणाऱया याचिकांवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पोलिसांतर्फे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली. मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांनी नितेश राणे, गीता जैन यांच्या कथित भडकावू भाषणांच्या ट्रान्सक्रिप्टची छाननी केली. त्यानुसार आरोपींविरुद्ध ‘भादंवि कलम 295-अ’ लागू होत नसल्याचा निष्कर्ष आयुक्तांनी काढला, अशी माहिती अॅड. वेणेगावकर यांनी दिली. त्यावर याचिकाकर्त्यांतर्फे घेण्यात आलेल्या आक्षेपाची दखल घेत न्यायालयाने संबंधित कलम आरोप निश्चितीदरम्यानही जोडले जाऊ शकते, असे नमूद केले.