मुस्लिम कुटुंबाला धमकावणे नितेश राणेंना भोवणार

मुस्लिम कुटुंबाला पोलीस ठाण्यात धमकावणे आमदार नितेश राणेंना चांगलेच भोवणार आहे. ही घटना खरी असेल आणि कणकवली पोलीस कोणाला पाठीशी घालत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. स्थानिक आमदाराने पोलीस ठाण्यात येऊन धमकावले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा मुस्लिम कुटुंबाने केला. स्थानिक आमदाराने धमकावले, याचा एक तरी पुरावा या कुटुंबाने सादर करावा. स्थानिक आमदार दुसऱ्या कामासाठी आले होते. काम झाल्यानंतर ते पोलीस ठाण्यातून निघून गेले. त्याची सविस्तर माहिती सादर केली जाईल, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

मुस्लिम कुटुंबाने केलेले आरोप खरे असल्यास कणकवली पोलिसांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तुम्ही करत असलेल्या आरोपींची माहिती शपथपत्रावर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मुस्लिम कुटुंबाला दिले.