विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. अजूनही मंत्रिपदावरून भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये धुसफूस सुरूच आहे. महत्त्वाच्या खात्यांसाठी दबावतंत्राबरोबरच तडजोडी सुरू आहेत. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे; परंतु भाजपचा गटनेता ठरलेला नाही. भाजपचे विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे केंद्रीय निरीक्षक उद्या मुंबईत दाखल होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपचा गटनेता ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असले तरी नेहमीचा शिष्टाचार म्हणून विधान भवनात बुधवारी सकाळी 10 वाजता भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे.
आझाद मैदानात शपथविधी सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी नेत्यांनी आज तयारीचा आढावा घेतला. मात्र मिंधे गटाचे त्यावेळी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या. अखेर आज रात्री भाजपचे नेते गिरीश महाजन ठाणे येथे शिंदे यांच्या निवासस्थानी मनधरणीसाठी पोहोचले.
…तर भाजप-अजितदादा गटाचा शपथविधी
शिंदे गटाचे ठरत नसेल तर भाजप आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी कोणत्याही परिस्थितीत होईल. महायुती सरकारमध्ये शिंदे गटाचा मागाहून समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
केसरकर म्हणतात, नाराजीच्या चर्चा थांबवा
शिंदे गटाच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुती सरकारचा शपथविधी हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे रखडलेला नाही. शिंदे यांचा महायुतीच्या सरकारमध्ये योग्य तो सन्मान राखला जावा एवढीच आमची व जनतेची इच्छा आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा थांबवा, असे दीपक केसरकर म्हणाले.