आमदार झिशान सिद्दिकी आणि अभिनेता सलमान खानला धमकी देऊन पैसे उकळू पाहणाऱया टॅटू आर्टिस्टला निर्मल नगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. गुरफान खान असे त्याचे नाव आहे. गुरफान हा सध्या बेरोजगार आहे. पैसे मिळावेत आणि दहशत व्हावी म्हणून त्याने धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे. गुरफानला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला कोठडी सुनावली आहे.
आमदार झिशान सिद्दिकी याचे वांद्रे पूर्व परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे. दसऱयाच्या दिवशी माजी मंत्री बाबा सिद्दिकी याच्यावर गोळीबार झाला होता. त्या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून 15 जणांना अटक केली होती. गेल्या आठवडय़ात एकाने झिशान सिद्दिकी यांनी जनतेच्या संपर्कासाठी कार्यालयात ठेवलेल्या मोबाईलवर फोन केला.
फोन करून झिशान आणि अभिनेता सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पैशाचीदेखील मागणी केली. या घटनेची माहिती समजताच निर्मल नगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 8 पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासासाठी एक पथक तयार केले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक नोयडा येथे गेले. तेथून पोलिसांनी गुरफानला ताब्यात घेऊन बेडय़ा ठोकल्या.