अत्याधुनिक यंत्रणा, गुन्ह्यांचा जलद निपटारा होणार, सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची निर्भया लॅब

झपाटय़ाने वाढत असलेल्या सायबर गुह्यांचा बिमोड करण्याबरोबर सबळ तांत्रिक पुरावे जमा करण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यांची ताकद आणखी वाढली आहे. आज दक्षिण, मध्य व पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज अशा निर्भया सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या. यामुळे जलदगतीने सायबर गुह्यांची उकल करण्यास मदत होणार आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा सायबर विभागदेखील तितकाच सक्षम असणे गरजेचे आहे. अनेकदा गुन्ह्यांत वापरलेला मोबाईल, लॅपटॉप तोडून मोडून टाकला जातो किंवा पाण्यात फेकला जातो. अशावेळी त्या डिव्हाईसमधील आवश्यक डाटा मिळविणे कठीण होऊन जाते. शिवाय सीडीआर, एचडीआर, डिलीट केलेले संदेश, पह्टो, व्हिडीओ पुन्हा मिळविण्यात समस्या येतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबईतील दक्षिण, मध्य व पूर्व सायबर पोलीस ठाण्यांमध्ये आजपासून आधुनिक निर्भया सायबर लॅब सुरू करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डी. बी. मार्ग पोलीस ठाणे येथील सायबर पोलीस ठाण्यात निर्भया सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे, वरिष्ठ निरीक्षक नंदपुमार गोपाळे आदी उपस्थित होते.

तीन सायबर पोलीस ठाण्यांमध्ये सुरू झालेल्या निर्भया सायबर लॅब या आधुनिक अॅप, सॉफ्टवेअर आदी यंत्रणांनी सज्ज आहेत. संबंधित प्रादेशिक विभागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी त्या लॅबमध्ये जाऊन सायबर गुह्यात मदत घेऊ शकतील. यामुळे किचकट सायबर गुह्यांची उकल करण्यास पोलिसांना सोयीचे होणार आहे.

काम वाढले, पण मनुष्यबळ नाही

सायबर पोलीस ठाण्यांमध्ये निर्भया सायबर लॅब सुरू केल्यामुळे कामाचा बोजा आणखी वाढणार आहे. या लॅबमध्ये पोलीस ठाण्याकडूनदेखील मदत घेतली जाणार आहे. असे असले तरी मनुष्यबळ मात्र तूर्तास तरी वाढविण्यात आलेले नाही. आहे त्या तुटपुंज्या मनुष्यबळामध्येच अधिकारी, कर्मचाऱयांना काम करावे लागणार आहे. आधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्यात, पण मनुष्यबळाअभावी सायबर पोलीस ठाण्यांमध्ये येणारी प्रकरणे किती गतीने पूर्ण केली जातील यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मनुष्यबळ वाढविल्यास प्रत्येक प्रकरणाचा निपटारा करणे आणखी सोयीचे होईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.