अख्खा गाव सायलेंट मोडवर! टीव्ही, मोबाइल, रेडिओ सगळं बंद, 42 दिवसांची अनोखी प्रथा सुरू

हिमाचल प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात. तिथे अनेक प्रथा- परंपरा पाळल्या जातात. हिमाचल प्रदेशात असलेल्या शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक देशभरातून येतात. हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात तर एक अनोखी परंपरा पाळली जाते. मकर संक्रांतीपासून अख्ख्या गावात सन्नाटा असतो. नऊ दिवस मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले जाते. संपूर्ण गावात गोंगाट, गडबड करण्यास मनाई असते.

कुल्लू जिल्ह्यातील नगरी मनाली असे या भागाचे नाव आहे. आजपासून (मंगळवार) गावात पुढील 42 दिवस ना टीव्ही सुरू राहणार, ना मंदिरात पूजाअर्चा होणार. गावकऱ्यांचे मोबाइल सायलंट मोडवर असतील. अगदी रिंगटोनही वाजणार नाही. अगदी देवळातील घंटेचाही आवाज होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. कुणी गावकरी एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलत नाहीत. दरवर्षी गावात न चुकता ही प्रथा पाळली जाते.

या अनोखी प्रथेमागे असा समज आहे की, मकर संक्रांतीनंतर देवदेवता तपस्येत गुंग होतात. त्यामुळे त्यांना शांत वातावरण मिळावे यासाठी गावकरी शांतता पाळता. टीव्ही, रेडियो, मोबाइल सर्व काही बंद केले जाते. मनालीतील गावांसोबतच गौशाल परिसरातील आठ गावांमध्येही देव आदेश जारी झालेत. उझी घाटीतल्या नऊ गावांमध्ये हजारो वर्षांपासून ही देव प्रथा-परंपरा ४२ दिवसांसाठी सुरू आहे.

गावकऱ्यांच्या समजुतीनुसार, आराध्यदेवता गौतम ऋषी, व्यास ऋषी आणि नागदेवता यांच्याकडून हे देव आदेश जारी केले जातात. मनालीच्या गौशाल, कोठी सोलंग, पलचान, रूआड, कुलंग, शनाग, बुरूआ, मझाच या ठिकाणी हे देव आदेश आहेत.

आजची युवा पिढीही वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात. इथे येणाऱ्या पर्यटकांनाही ही प्रथा पाळावी लागते. मनालीच्या सिमसा येथील देवता कार्तिक स्वामी मंदिरातील दरवाजे 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.