>> निमिष पाटगावकर
उत्तम समुद्रकिनारे, नैसर्गिक विविधता, त्याचबरोबर मानवनिर्मित सागरी सफरी आणि साहसी खेळ हे सर्व मॉरिशसला बघताना सारखी आठवण येते ती आपल्या कोकणाची. मॉरिशस हे जास्त जवळचे वाटते ते तिथल्या हिंदू संस्कृतीमुळे आणि प्रयत्नांनी टिकवून ठेवलेल्या मराठी भाषेमुळे. आपल्या मायभूमीपासून दूर एक चिमुकले बेट आपली संस्कृती, भाषा कशी टिकवून ठेवायची याचे जणू काही धडेच आपल्याला देत आहे.
मी जेव्हा परदेशात थोडय़ा दिवसांसाठी भटकंती करतो तेव्हा शक्यतो तिथली संस्कृती, खाद्यपदार्थ, चालीरीती आणि जमले तर तिथली भाषा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी मनात कायम आपल्या मराठी संस्कृतीशी या बाहेरच्या जगाचा ताळमेळ चालू राहतो. कारण जे रक्तात भिनले आहे ते वेगळे करू शकत नाही. एखादा मोमो मोदकाची आठवण करून देतो, तर कधी दक्षिणपूर्व आशियात आपले देव दिसले की, आपोआप हात जोडले जातात. या सर्व ठिकाणी मराठी संस्कृतीशी जवळीक साधणारे सर्व दिसते, पण अभिजात दर्जा असलेली मराठी भाषा अर्थातच दिसत नाही. याला अपवाद एक देश आहे तो म्हणजे मॉरिशस!
मी जेव्हा मॉरिशसच्या सर सिवूसागर रामगुलाम विमानतळावर उतरलो तेव्हा सर्वात प्रथम जाणवले ते म्हणजे हिंदुस्थानीयांसाठी इथे व्हिसामुक्त प्रवेश असल्याने इमिग्रेशन अधिकाऱ्यांपासून सर्वांचे हिंदुस्थानीयांसाठी असलेले अगत्य. विमानतळावर आम्हाला न्यायला गाडी आली होती त्याचा ड्रायव्हर होता राजीव. त्याला मोडके तोडके हिंदी येत होते. आमची गाडी जेव्हा विमानतळ सोडून मुख्य रस्त्याला लागली तेव्हा मला क्षणभर मी कोल्हापूर-सांगली रस्त्यावर असल्यासारखे वाटत होते. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला उढसाचे मळे वाऱ्यावर डोलत आमच्या स्वागताला उभे होते. या उढसाशीच मराठी कनेक्शन आहे. मॉरिशस जेव्हा जगाने संपूर्ण दुर्लक्षिलेले बेट होते तेव्हा वसाहतवादाच्या काळात 1598 मध्ये डच इथे प्रथम पोहोचले आणि मानवाचा पाय या बेटाला लागला. त्याच्या राजा मॉरिसवरून याचे नाव मॉरिशस पडले. असे म्हणतात की आपल्या पुराणाशी नाते सांगणारी वेगळी कथा आहे. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा आपल्या बाणाने मारीच राक्षसाला बाण मारून शत योजने दूर उडवले तेव्हा तो एका अज्ञात बेटावर येऊन पडला. हेच ते बेट म्हणून मारीचवरून मॉरिशस नाव झाले.
डच लोकांना इथे बस्तान बसवायला जमले नाही आणि फ्रेंचांनी हे बेट काबीज केले. पुढे ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पाडाव करून हे बेट आपल्या ताब्यात घेतल्यावर इथे शेतीचे मळे फुलवायला मजूर कमी पडायला लागले. आफ्रिकेतील गुलामीचा कायदा नष्ट झाल्याने तिथूनही मजूर आणता येईनात. मॉरिशसच्या शेतमळ्यांच्या मालकांना ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून मजूर आणायला परवानगी दिली. 15 जून 1842 ला मुंबई बंदरातून 173 मजुरांना घेऊन एक जहाज निघाले. यात शंभरहून अधिक रत्नागिरी, मालवण असे कोकणातले तर कोल्हापूर, सांगलीसारखे देशावरचे मराठी मजूर होते. हिंदुस्थानातील रोगराई, दुष्काळ वगैरेना कंटाळून आपले नशीब अजमावायला हे आपल्या कुटुंबासह मॉरिशसला गेले आणि मराठी माणसांचा ओघ मॉरिशसला चालू झाला. आज इथे जवळपास 18 टक्के लोक मराठी वंशाचे असून मराठी भाषा टिकवायचे मनापासून इथे प्रयत्न केले जातात. हिंदू धर्मीयांची संख्या 53 टक्के असल्याने इथे गणपती, दिवाळी धूमधडाक्यात साजरे होतात.
इतक्या लोकांनी राज्य केल्यामुळे आणि स्थलांतरित लोकांमुळे हा देश म्हणजे एक सांस्कृतिक खिचडी झाली आहे. हॉटेलवर जाताना गाडीत जो रेडिओ चालू होता त्यात फ्रेंच भाषेतून बॉलीवूड गाण्यांची फर्माईश चालली होती, तर हॉटेलवर पोहोचल्यावर तिथल्या टीव्हीवर चॅनल बदलताना त्यांच्या सरकारी वाहिनीवर चक्क मराठी चित्रपट ‘सरकारनामा’ चालू होता. आमचे हॉटेल म्हणजे अथांग निळ्याशार समुद्राच्या काठावरचे एक सुंदर रिसॉर्ट होते. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या व्हरांड्यात ब्रेकफास्टला बसले तरी समोर समुद्र दिसायचा. आम्ही ब्रेकफास्ट करत असताना तिथला एक ग्रुप येऊन आमच्या टेबलाच्या बाजूला जुनी हिंदी गाणी अतिशय सुंदर वाजवत होते. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याच्या संस्काराची मुळे त्याच्या आत्म्यात खोलवर रुजलेली असतात.
मॉरिशसमध्ये भटकंती करायची अनेक ठिकाणे आहेत आणि आपापल्या आवडीनुसार करायच्या अनेक गोष्टी आहेत. मॉरिशसचे पंपलमुसेस गार्डन हे बोटॅनिकल गार्डन आहे, पण जसजसे तुम्ही आत जाता तसे झाडांच्या विविध प्रजातींबरोबर इथे नांदणाऱया काही विशिष्ट प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घडते. निसर्गाचे अजून दोन अवतार बघायचे असतील तर प्रथम चॅमरेल या ठिकाणी जायला हवे. सात रंगांच्या वाळूचे मिश्रण असलेले हे नॅशनल पार्क आहे. वास्तविक ही वाळू नसून बेसॉल्ट दगडाचे वेगवेगळय़ा वाळूत रूपांतर झालेले खडक आहेत. त्याचप्रमाणे इथे एकेकाळच्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेले एक ठिकाण आहे. या टेकडीवर उभे राहिले की, एखाद्या दरीसारखा झालेला तो भाग बघायला मिळतो. निसर्गाचा अजून एक चमत्कार बघायचा असेल तर इथे सात वेगवेगळ्या रंगांच्या वाळू एखाद्या भव्य रांगोळीसारख्या नांदताना दिसतात. पोर्ट ल्युईस हे राजधानीचे शहर असून आधुनिक आहे. इथून जवळच एक किल्ला आहे, ज्यावरून पोर्ट ल्युईसचे दर्शन घडते. वसाहतवादाच्या काळात या किल्ल्याला महत्त्व होते. शहराच्या एका बाजूला कॅसिनो आहे.
हिंदू संस्कृतीचा सहवास तर अनेकदा इथे वेगवेगळ्या तऱहेने दिसतो, पण गंगा तालाब ही जागा म्हणजे एक तीर्थक्षेत्रच आहे. इथे गणपती, लक्ष्मी, सरस्वती, दत्तगुरू ते अगदी साईबाबांपर्यंत अनेक मोठमोठय़ा मूर्ती आहेत. पण हे स्थान आहे भगवान शंकरांचे. इथे शंकराची भव्य मूर्ती आहे. महाशिवरात्रीला इथे सार्वत्रिक सुट्टी असते आणि मोठा महोत्सव या गंगा तालाबवर असतो. अनेक लोक आपली कावड घेऊन इथे दूर दूर अंतराहून चालत येतात आणि शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. या परिसरात तुम्ही आलात तर एखाद्या तीर्थक्षेत्रास आल्यासारखे वाटते.
उत्तम समुद्रकिनारे, नैसर्गिक विविधता, त्याचबरोबर मानवनिर्मित सागरी सफरी आणि साहसी खेळ हे सर्व मॉरिशसला बघताना सारखी आठवण येते ती आपल्या कोकणाची. मॉरिशस हे जास्त जवळचे वाटते ते तिथल्या हिंदू संस्कृतीमुळे आणि दुरून का होईना, प्रयत्नांनी टिकवून ठेवलेल्या मराठी भाषेमुळे. अनेक भाषांच्या खिचडीतही मराठीपण इथे टिकवून ठेवले आहे. आपल्या मायभूमीपासून दूर एक चिमुकले बेट आपली संस्कृती, भाषा कशी टिकवून ठेवायची याचे जणू काही धडेच आपल्याला देत आहे.