रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा! नीलेश लंके यांची टीका

रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा आहे. ती परंपरा माजी खासदार सुजय विखे पाळत आहेत. मतदान यंत्रांच्या तपासणीची मागणी करणे ही बाब त्यांनी ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली, त्या सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करणारी आहे. विखे कुटुंबीय कोणाशीच प्रामाणिक राहू शकत नाहीत, अशी टीका खासदार नीलेश लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

नगर लोकसभा मतदारसंघातील चाळीस मतदान यंत्रांची तपासणी करण्याची मागणी भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी केली होती. निवडणूक आयोगाने विखे यांची मागणी मान्य केली आहे. या संदर्भात बोलताना खासदार लंके यांनी विखे आणि त्यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला. तसेच मतदान यंत्रांच्या तपासणीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.

खासदार लंके म्हणाले, ईव्हीएम मशीन, निवडणूक निर्णय अधिकाऱयांची कार्यपद्धती याबाबत खरेतर आम्ही तक्रार करायला हवी होती. मात्र, देशात आणि राज्यात त्यांचेच सरकार आणि त्यांचीच यंत्रणा असताना अविश्वास दाखवत असाल तर तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत, असा याचा अर्थ आहे, असे लंके म्हणाले. दरम्यान, माझा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे, असे लंके यांनी सांगितले.

पराभव पदरी पडल्याने आता समाजापुढे जायचे कसे? आम्ही आमच्या गुणामुळे पराभूत झालो, हे समाजाला सांगता येत नाही. त्यामुळेच मतदान यंत्रांमध्ये गडबड आहे, मशिन मॅनेज केल्या आहेत, असा कांगावा माजी खासदार विखे करत आहेत, असा टोला खासदार लंके यांनी लगावला.

त्यांच्या आजोबांनीही तेच केले!

n सन 1991 साली झालेल्या निवडणुकीत माजी खासदार विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे यांचा पराभव झाला. त्यावेळीही ते न्यायालयात गेले. रडीचा डाव खेळण्याची त्यांच्या कुटुंबाची परंपरा माजी खासदार सुजय विखे पुढे चालवत आहेत. ती त्यांची खासियत आहे, असा टोला लंके यांनी लगावला.