<<<नीलेश कुलकर्णी>>>
झारखंडमध्ये भाजपने महाराष्ट्रासारखाच ‘खोके प्रयोग’ करून तिकडचे औटघटकेचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चामधून आपल्या पक्षात घेतले. मात्र दिल्लीकरांच्या या मनमानीविरोधात आता पक्षातले निष्ठावंतच ‘फटाके’ वाजवू लागले आहेत. झारखंडमध्ये सध्या भाजपांतर्गत ‘गँग ऑफ वासेपूर’ सुरू आहे. इतर पक्षांतील मंडळींना आणून त्यांना निवडणुकीत संधी देण्याच्या पक्षाच्या धोरणाविरोधात झारखंडमध्ये एल्गार पुकारला गेला आहे. त्यामुळे भाजपच्या तथाकथित शिस्तीचे ‘गँगवॉर’ झाले आहे.
एकीकडे देशभरात दिवाळीत फटाके वाजवून जनता आनंद व्यक्त करत आहे, तर झारखंडमध्ये भाजपमधील निष्ठावंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरीच्या फटाक्यांची ‘वात’ पेटवत आहेत. झारखंडमधल्या निष्ठावंतांना कसे आवरायचे? असा प्रश्न भाजप नेतृत्वापुढे उभा ठाकला आहे. शिवराजसिंग चौहान व हेमंत बिस्वा सरमा या काबील नेत्यांकडे झारखंडची जबाबदारी असल्यामुळे त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. नाराज नेत्यांच्या नाकदुऱ्या काढणे व त्यांचे चरणस्पर्श करण्याचीही नामुष्की आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष रवी राय यांची समजूत काढता काढता शिवराजमामांना घाम फुटलाय. राय यांना कार्यकारी प्रदेशाध्यक्ष बनवून त्यांची कशीबशी समजूत काढली गेलीय. अमनप्रीत यांनाही असेच ‘शांत’ करण्यात आले आहे. कमलेश राम यांनाही राम राम करत मनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निरंजन राय या एका बंडखोर नेत्याने थेट बाबूलाल मरांडी यांच्या विरोधात दंड थोपटल्याने दिवाळीचा सण घरी बसून गोड करण्याऐवजी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी निरंजन यांची समजूत घालत आहे.
भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. एकीकडे झारखंड भाजपमधील बंडखोरांनी पक्षाचा खरेखुरा चाल, चरित्र, चेहरा उघड केलेला असताना साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना निवडणुकीतून बाद करण्यासाठी रचलेला रडीचा डावदेखील उघडा पडला आहे. लोकसभेला इंदूर व सुरतमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्जच बाद करून किंवा दबाव आणून त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावून भाजपने या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा पराक्रम केला होता. झारखंडमध्ये महान स्वतंत्रता सेनानी सिद्धधो मुर्मू व कान्हो मुर्मू यांचे वंशज असलेल्या मंडल मुर्मू यांना हाताशी धरून हेमंत सोरेन यांची उमेदवारीच रद्द करण्याचे कुभांड भाजप नेत्यांनी रचले. मंडल हे हेमंत यांचे विधानसभेच्या अर्जाचे प्रस्तावक आहेत. त्यांना चंपई सोरेन यांच्यामार्फत ‘ट्रप’ करत ‘अगुवा’ करण्यात आले. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हे कारस्थान रचले. तसे फोटो सगळीकडे झळकले. मंडल मुर्मू हे ‘नॉट रिचेबल’ आहेत हे लक्षात आल्यानंतर हेमंत यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी मोठ्या हिकमतीने मंडल यांचा शोध लावला. त्या वेळी ते दोघा भाजप नेत्यांसोबत एका जीपगाडीत आढळले. हेमंत यांनी वेळीच डॅमेज कंट्रोल केले, अन्यथा त्यांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागले असते.
सुखबीर बादलांचे काय होईल?
पंजाबमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत. मात्र कधीकाळी तिथला मातब्बर पक्ष असेलला अकाली दल ही निवडणूक लढवीत नाहीये. तब्बल 35 वर्षांनंतर हे असे घडत आहे, त्याचे कारण म्हणजे अकाल तख्तने अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांना ‘तनखय्या’ घोषित करणे. अकाल तख्तने भ्रष्टाचार व अनागोंदीचा आरोप करत सुखबीर यांना राजकीय हालचालींपासून दूर राहण्याची ‘सजा’ सुनावली आहे. ही सजा पूर्ण होईपर्यंत बादल सक्रिय राजकारणात भाग घेऊ शकणार नाहीत. परिणामी पोटनिवडणुकीत अकाली दल कुठेही नाही.
पंजाबात अकाली दलाला दिवंगत प्रकाशसिंग बादल यांनी लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचवले होते. सरदार प्रकाशसिंगाबद्दल पक्षविरहित सर्वांनाच आदर होता. मात्र सुखबीर यांच्या हाती पक्षाची सूत्रे आल्यानंतर सुखबीर व त्यांच्या पत्नी हरसिमरत यांच्या कार्यपद्धतीबद्दल टीका झाली. पंजाबातील पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सुखबीर यांचे चुलत बंधू मनप्रीत यांनी अकाली दल, काँगेस, स्वतःचा पक्ष आणि आता भाजप अशी ‘सर्वपक्षीय परिक्रमा’ पूर्ण केली आहे. एकेकाळी ‘ड्रग्ज माफिया’ म्हणून ज्यांच्यावर आरोप केले त्याच मनप्रीत बादलांना भाजपने पावनपवित्र करून घेतले आहे. त्यामुळे भाजपचे विधानसभेतले संख्याबळ एकाने वाढून फार फार तर दोन होईल, अकाली दलाएवढेच. फक्त एका जागेसाठी केवढा हा खटाटोप!
‘पीके’ का क्या होगा?
‘पीके का क्या होगा?’ हा सवाल सध्या बिहारसह उत्तर हिंदुस्थानच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. हे पीके म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत तेच ते निवडणूक रणनीतीकार. मात्र आता सगळ्या राजकारण्यांपासून चार हात लांब राहत प्रशांत कुमार यांनी स्वतःचाच राजकीय पक्ष स्थापन केला आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी सध्या चार जागांवर पोटनिवडणुका आहेत. या चारपैकी दोन जागांवर उमेदवार बदलण्याची नामुष्की पीकेंवर आली आहे.
त्याचे झाले असे की, भारतीय सैन्य दलात उपसेनाप्रमुख राहिलेल्या एस. के. सिंग यांना तरारी मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्याची बिहारात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्याचे कारण म्हणजे बिहारमधून आतापर्यंत भारतीय सैन्य दलात मोठ्या पदावर फक्त दोघे जण पोहोचले, त्यापैकी हे सिंह एक. मात्र हे सिंह बिहारचे मतदार नसून नोएडातले मतदार आहेत हे लक्षात आल्यानंतर सिंह यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की पीकेंवर आली, तर बेलागंजच्या जागेवर चर्चेत असलेले गणित शिक्षक खिलाफत हुसैन यांना पीकेंनी उमेदवारी घोषित केली खरी. मात्र खिलाफत यांनी ‘हमारे पास तो पैसे नही है, हम पैसे चुनाव लड सकते है?’ अशी पृच्छा करत पीकेंच्या रणनीतीविरोधातच ‘खिलाफत’ केली. त्यामुळे ऐनवेळी पीके यांना मोहंमद हुसैन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले.
पोटनिवडणुकांमध्येच पीकेंना हा असा घाम फुटल्याने त्यांचे विधानसभा निवडणुकीत काय होईल? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या रणांगणात ‘काठावर’ती बसून रणनीती ठरविणे व मार्गदर्शन करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष निवडणुकीचे रणांगण भलतेच कठीण असते हे आता यथावकाश पीकेंनाही उगमले आणि समजले असेलच.