
उंब्रज-वडगाव येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा अमेरिकेत अपघात झाला असून, तिची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार तिच्या रक्तातील व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कोणीही तिथे हजर नसल्याने गुन्हा दाखल करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, तिकडे जाण्यासाठी तिच्या वडिलांची धडपड सुरू असून, सरकारकडून त्यांना साहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे.
अपघातात नीलम हिची परिस्थिती नाजूक असून, शस्त्रक्रिया करावी लागली आहे. याबाबतचा ई-मेल रुग्णालयाने कुटुंबीयांना पाठविला असून, नजीकच्या सदस्यांना तातडीने अमेरिकेत येण्याची सूचना ई-मेलद्वारे केली आहे. दरम्यान, कुटुंबीयांची अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळण्यासाठी धावपळ सुरू आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मुलगी आणि वडिलांची भेट दुरावली आहे. केंद्र सरकारने याबाबत साहाय्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अनेकांना भेटूनही त्यांच्या पदरी निराशाच आली असून, अद्यापि सरकारकडून मदत मिळालेली नाही.