
एमआयडीसीतील राव स्पोर्ट्स अकादमी ही डोंबिवलीकरांची डोकेदुखी बनली आहे. रात्रीच्या वेळी क्रिकेट सामने, लाऊडस्पीकरचा कर्कश्य आवाज आणि आसपासच्या परिसरात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे डोंबिवलीच्या मिलापनगरवासीयांची अक्षरशः झोप उडाली आहे. या क्रीडासंकुलामुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले असून व्यवस्थापक नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
एमआयडीसीतील मिलापनगर रहिवासी क्षेत्र आहे. याच परिसरात डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकादमी भव्य क्रीडासंकुलदेखील आहे. मात्र अकादमीत क्रिकेटच्या सामान्यांचे आयोजन केले जाते. रात्री 10 वाजल्यानंतरही क्रिकेटचे सामने सुरू असल्याने रहिवाशांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोसायट्यांसमोरील गेट तसेच रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींची त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिसात अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत. मात्र या स्पोर्ट्स अकादमीवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास भूखंड परत घेण्याचा अधिकार एमआयडीसीकडे आहे, परंतु एमआयडीसी प्रशासन अंमलबजावणी करत नसल्यामुळे व्यवस्थापकांना अभय मिळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वेळोवेळी नियमांचे उल्लंघन
एमआयडीसीकडून दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर हे क्रीडासंकुल देण्यात आले आहे. या भाडेकरारात स्थानिक रहिवाशांसाठी जॉगिंग आणि खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, पर्यावरणाची हानी टाळावी, रहिवाशांना त्रास होईल असे उपक्रम टाळावेत अशा अनेक अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र क्रीडासंकुल व्यवस्थापन वेळोवेळी नियमांचे उल्लंघन करत अटी-शर्तीना पायदळी तुडवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.