लक्षवेधक –  निधी तिवारी पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी

भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच आयएफएस अधिकारी असलेल्या निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने निधी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. निधी तिवारी या 2014 च्या बॅचच्या आयएफएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम केले आहे. पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ जोपर्यंत आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्या या पदावर कार्यरत राहतील. निधी तिवारी यांनी 2013 च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 96 वी रँक मिळवली होती.

आयफोनसाठी आयओएस 18.4 अपडेट जारी

ऍपलने आयओएस 18.4 हे अपडेट हिंदुस्थानात अखेर लाँच केले. नव्या अपडेटसोबत ऍपल इंटेलिजन्सचे अनेक फिचर्स आता हिंदुस्थानात उपलब्ध होतील. या फिचर्समध्ये रायटिंग टूल्स, क्लीनअप टूल, व्हिज्युअल इंटेलिजन्ससह अन्य एआय फिचर्सचा समावेश आहे. या अपडेटचे खास वैशिष्टय़े म्हणजे आता हिंदुस्थानात आयफोन 15 प्रो आणि आयफोन 16 सीरिजचे युजर्ससुद्धा या फिचर्सचा वापर करू शकतील. या अपडेटसोबत भाषा सपोर्टही वाढवले आहेत. रायटिंग टूल्समध्ये मेल, मेसेज, नोट्स आणि पेजेससारख्या ऍप्समध्ये एआय फिचर्स मिळतील.

इम्रान खान यांना नोबेल शांततेसाठी पुन्हा नामांकन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेलच्या शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टीट सेंट्रमशी संबंधित पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सने पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी इम्रान खान यांच्या नामांकनाची घोषणा केली. इम्रान खान हे 2023 पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानच्या राष्ट्रीय तिजोरीत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांना 2019 मध्येसुद्धा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले होते.