पॅरिस ऑलिम्पिकचा थरार संपला. आता 2028 ला होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदुस्थानचा स्टार खेळाडू विराट कोहलीची लोकप्रियता होय, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे संचालक निकोलो पॅम्प्रियानी यांनी सांगितले.
निकोलो कॅम्प्रियानी म्हणाले की, ‘जगभरातील सुमारे 2.5 अब्ज लोकांना क्रिकेट आवडते. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकप्रिय खेळाचे ऑलिम्पिकमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे आहे. माझा मित्र विराट कोहली घ्या. तो सोशल मीडियावर जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारा खेळाडू आहे. लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्स यांच्यापेक्षा जास्त विराट कोहलीला लोक फॉलो करतात. तो क्रीडा क्षेत्रातील ग्लोबल आयकॉन आहे.’
128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते, मात्र या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकच सामना खेळला गेला. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले नाही, मात्र आता तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनामुळे जगभरातील क्रिकेट चाहते खूश झाले असून, त्यांच्या नजरा आता लॉस एंजेलिस ऑलिम्पिककडे लागल्या आहेत.