जम्मू-काश्मीरमधील वाढती घुसखोरी आणि दहशतवादी कटबाबत एनआयएने छापेमारी सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील रामबन, किश्तवाड, डोडा, रियासी आणि उधमपूर भागात एनआयएकडून छापेमारी सुरू आहे.
हल्ली काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे.
सुरक्षा दलांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. घटनास्थळाहून स्वयंपाकाची भांडी आणि खाद्यपदार्थ सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुलवामा आणि बारामुल्ला जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी आणि दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.