तहव्वूर राणासोबतच्या मिस्ट्री गर्लवर एनआयएची नजर

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणासोबत भारतात फिरलेल्या मिस्ट्री गर्लच्या शोधात सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आहे. राणा भारतात होता तेव्हा ही मिस्ट्री गर्ल त्याच्यासोबत उत्तर प्रदेशातील आगरा व हापूड भागांत दिसली होती.

राणा 13 ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात भारतात होता. तेव्हा तो दिल्ली, आगरा व हातूड भागांत दिसला होता. त्या वेळी त्याच्यासोबत बुरखा घातलेली एक महिला होती. ती आपली पत्नी असल्याचे राणाने सांगितले होते. आता ही महिला कुठे आहे. ती खरोखर राणाची पत्नी होती का? याचा तपास सध्या एनआयए करत आहे. राणाची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत तो अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. लष्कराच्या पोशाखावर राणाचे विशेष प्रेम आहे. दहशतवाद्यांच्या बैठकीत तो याच पोशाखात जायचा, अशी माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक

राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे. पाकिस्तानी सैन्यात तो डॉक्टर होता. कॅनडामध्ये त्याने व्यापार केला आहे. नंतर तो दहशवादी संघटनेत सामील झाला. मुंबई हल्ल्यासाठी त्याने रेकी केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याच्या तब्बल 16 वर्षांनी तो हिंदुस्थानाच्या हाती लागला आहे.