
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देण्याची घोषणा केल्यानंतर तपासचक्राला वेग आला असून एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे आहेत. साक्षीदारांकडून महत्त्वाची माहिती मिळत असून त्यांची जबानी घेण्यास एनआयएने सुरुवात केली आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने औपचारिक कारवाई सुरू केली असून या प्रखरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणांची अनेक पथके विविध ठिकाणी धाडी टाकत असल्याचे चित्र आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरूच असून एनआयएने गेल्या 5 दिवसात तब्बल 500 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
बीएसएफ जवानाची गर्भवती पत्नीही पाकिस्तानच्या ताब्यात
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या पुर्नम साहू या जवानाला अटक केली. अटक होऊन 80 तासांहून अधिक काळ लोटला तरीही त्याची सुटका झालेली नाही. त्याला का सोडण्यात येत नाही याबद्दल वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी गेलेली त्यांची गर्भवती पत्नी रजनी हिलादेखील सीमा ओलांडताच पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.
मुख्य साक्षीदार सापडला
दहशतवादी हल्ल्याचा मुख्य साक्षीदार सापडला असून तो एक स्थानिक फोटोग्राफर आहे. हल्ल्याच्या वेळी हा फोटोग्राफर झाडावर चढून संपूर्ण हल्ल्याचे चित्रीकरण करत होता. त्याने रेकार्डिंग केलेले व्हिडीयो या हल्ल्यात महत्त्वाचे पुरावे ठरणार असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. या फोटोग्राफरच्या रेकार्डिंगनुसार सुरुवातीला दोन दहशतवादी एका दुकानाच्या मागे लपले होते. पोलिसांच्या वेषात आलेले हे दहशतवादी सर्वात आधी पुढे आले आणि त्यांनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास सांगितले. त्यानंतर चार जणांना गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे सर्वत्र एकच घबराट पसरली. त्यामुळे लोक इकडेतिकडे सैरावैरा पळू लागले. त्याच वेळी झिप लाईनवरून इतर दहशतवाद्यांनी बाहेरून गोळीबार सुरू केला. दहशतवादविरोधी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हल्ल्याचा तपास सुरू आहे.
निष्पाप कश्मिरींना वेगळे पाडू नका – मेहबुबा मुफ्ती
जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील कारवाई केंद्र सरकारने तीव्र केली आहे. मात्र ही कारवाई करताना केंद्राने काळजीपूर्वक पावले उचलावीत. निष्पाप कश्मिरींना वेगळे पाडू नये, अशी विनंती माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. हजारो कश्मिरींना अटक करण्यात आली आहे, तसेच दहशतवाद्यांसह सामान्य कश्मिरींची घरे पाडण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. या कारवाईमुळे निष्पापांची होरपळ होऊ देऊ नका. त्यामुळे दहशतवाद्यांचे फूट पाडण्याचे इरादे सफल होतील, असा इशारा त्यांनी दिला.
तीन दिवसांत 537 पाकिस्तानी परतले
तीन दिवसांत पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासातील नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह 537 पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या 14 पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवले. व्हिसाची मुदत संपल्याबाबत एमआरए मार्ग पोलिसांनी 65 वर्षीय पाकिस्तानी नागरिकाला अटक केली होती. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी दूतावासाला पाच वेळा स्मरणपत्रे पाठवली होती.
हल्ल्यातील पीडितांच्या चौकशीसाठीही एनआयए पथके सक्रिय
एनआयए हल्ल्यातील पीडितांचीही चौकशी करत असून त्यांचे जबाबही नोंदवले जात आहेत. हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांकडून हल्ल्या वेळी नेमके काय घडले याची माहिती गोळा केली जात आहे. महाराष्ट्र, ओदिशा, पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये एनआयएची पथके सक्रीय झाल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आणखी तीन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. आज जम्मू आणि कश्मीरमधील बांदीपोरा, पुलवामा आणि शोपियान जिह्यांत तीन दहशतवाद्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आले. अशा प्रकारे आतापर्यंत नऊ दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली. दहशतवाद्यांची रसद तोडण्याचे काम सुरक्षा दलांकडून अविरतपणे सुरू असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या अदनान शफीचे शोपियान जिह्यातील वांदीना येथील घर पाडण्यात आले. याशिवाय पुलवामा जिह्यातील आमीर नाझीर, बांदीपोरा येथील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जमील अहमद शेरगोजरी यांच्या घरांवरही कारवाई करण्यात आली. शेरजोगरी हा 2016पासून दहशतवादी म्हणून सक्रीय आहे.
हिंदुस्थानी नौदल सज्ज, अरबी समुद्रात युद्धनौकांचा सराव
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव सतत वाढत आहे. अशातच नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौकांचा सराव करून शत्रुराष्ट्राच्या मनात धडकी भरवली. युद्धनौकांनी लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची चाचणी केली. नौदलाने प्रात्यक्षिक दाखवून आपण सज्ज असल्याचे संकेत दिले. नौदल कधीही, कुठेही, कोणत्याही प्रकारे देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी तयार आहे, असे नौदलाने आज निवेदनाद्वारे सांगितले.
आतंक को हराना है…अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये
पहलगाम हल्ला झाल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी आज काश्मिरमध्ये दाखल झाले. हमको यहा आना है… आतंक को हराना है… असे म्हणत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी पहलगाम, काश्मीरला यावे, असे आवाहन केले. जी घटना झाली ती अत्यंत दुŠखद आहे. माझ्या वाचण्यात आले की कश्मीरचे 90 टक्के बुपिंग रद्द झाले. पण कश्मीरमधील जे लोक आहेत त्यांना आपल्याला सांभाळायचे आहे, असे ते म्हणाले.
मुंबईत पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर शनिवारी पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट हाती घेतले. पोलिसांनी 192 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. तर काही ठिकाणी नाकाबंदी केली होती. पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 63 मद्यपी चालकावर कारवाई केली.
हिंदुस्थानच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा – काश पटेल
पहलगाम हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद उपटून टाकण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे एफबीआय संचालक काश पटेल यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर ही भूमिका मांडली.
काँग्रेसचे समर्थन – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील केंद्र सरकारच्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. देशाच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र येऊन लढावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
किश्तवाडमध्ये लष्करी गणवेशाची विक्रीवर बंदी
लष्करी गणवेशाचा गैरवापर रोखण्याकरिता जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिह्यात लष्करी गणवेशाबरोबरच लढाऊ पोशाखांची विक्री, शिलाई आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. किश्तवाडचे उपायुक्त राजेश कुमार शवन यांनी हे आदेश दिले.
मोदींचे लक्ष फक्त बिहारच्या निवडणुकीकडे -नाना पटोले
काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी कश्मीरमधील पहलगाम येथे जाऊन जखमींची विचारपूस केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामकडे दुर्लक्ष करीत बिहारच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले, अशी टीका काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. गोंदियाच्या नवेगावबांध येथे कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्दय़ावरून भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला.
सिंधू जलवाटप करार रद्दबाबत केंद्र सरकारकडून जनतेची दिशाभूल – अॅड. प्रकाश आंबेडकर
केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थान देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानविरुद्ध जलयुद्ध पुकारून धडा शिकविण्यास सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली. केंद्र सरकारकडून हे सांगण्यात येत असले तरीदेखील केंद्र सरकार सिंधू जलवाटप करार रद्द केल्याबद्दल खोटं सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी हिंदुस्थान सरकारकडून सिंधू जलवाटप करारांतर्गत पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच दाखवलं. या पत्रात पाकिस्तानला जाणारे पाणी बंद केल्याचा कसलाच उल्लेख नाही. आम्ही धरणातलं पाणी सोडणार नाही, असाही उल्लेख नाही. याचाच अर्थ करार रद्द केलेला नाही, असे ते म्हणाले.