
प्रयागराजच्या संगमातील पाणी अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी अत्यंत घातक आहे, असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला. यावरून गोलमोल उत्तरे देणाऱया उत्तर प्रदेश सरकारला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने चांगलेच झापले. लांबलचक उत्तरे नकोत, संगमाचे पाणी दूषित का झाले ते सांगा, असा सवाल एनजीटीने केला. तसेच सीपीसीबीच्या अहवालावर पुढील कार्यवाही करून गंगा आणि यमुनेतील पाण्याच्या गुणवत्तेचे नवीन अहवाल एका आठवडय़ात सादर करण्याचे निर्देशही उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या प्रकरणी सुनावणीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलाने सांगितले की, सीपीसीबीने चाचणी अहवाल जोडलेला नाही. यूपीपीसीबीने अहवाल दाखल केला आहे आणि बाजू मांडली आहे, असे सांगितले. यावर उत्तर प्रदेश सरकार सीपीसीबीच्या अहवालावर प्रश्न उपस्थित करत आहे का, असा सवाल केला. तसेच नदीचे पाणी स्वच्छ राहावे ही सर्वस्वी उत्तर प्रदेश सरकारची जबाबदारी आहे असे दरडावलेही. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी गंगेचे पाणी स्वच्छच dअसल्याचे विधानसभेत सांगितले.
चेंगराचेंगरीत 37 मृत्यू-योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीत 37 भाविकांचा मृत्यू झाल्याचे विधानसभेत सांगितले. संगम तटावरील बॅरिकेड्स तुटल्यामुळे च्गेंराचेंगरी झाली आणि त्यात 66 भाविक सापडले. यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला होता, तर विविध ठिकाणी आणखी सात भाविकांचा मृत्यू झाला. या घटनांचा चेंगराचेंगरीशी संबंध जोडू नये, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले. 36 मृत्युमुखींपैकी 25 जणांच्या नातेवाईकांनी मृतदेह घरी नेले. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
भाविकाला फुप्फुसाचा संसर्ग
त्रिवेणी संगमात स्नान केलेल्यांना फुप्फुसाचा संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका महिला भाविकाची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेशन आणि प्रोन पोझिशनवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी कुंभमेळय़ात स्नान करताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. डॉ. दीपशिखा घोष यांनी ‘एक्स’वरून याबाबतची माहिती दिली आहे. प्रयागराजमधील गंगा-यमुनेचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य नाही असा अहवाल दिल्यानंतर आता डॉक्टरांनी या पाण्यामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याचा इशारा दिला आहे.