
बेस्टकडून कायमस्वरूपी नवीन भरती केली जात नसल्याने आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आधीच कोट्यवधीच्या आर्थिक संकटात सापडलेला बेस्ट उपक्रम आता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बेस्ट प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या 25 हजार 562 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून पुढील दोन वर्षांत 25 हजार कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे बेस्टची डोकेदुखी वाढणार आहे.
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टमुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षितपणे होतोच, पण त्यांना माफक दरात मुंबईकरांना वीजपुरवठाही केला जातो. कोविड असो की, अतिवृष्टी बेस्टने नेहमीच नियम आणि हृदय मोठे करून मुंबईकरांची मदत आणि सेवा मनोभावे केली आहे. त्यामुळे लोकलबरोबर बेस्टकडेही मुंबईकर आदराने आणि विश्वासाने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून बेस्ट प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे उपक्रमावर कोट्यवधीचा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
परिवहन विभागाबरोबरच गेल्या काही वर्षांत विद्युत विभागाला टाटा पॉवर स्पर्धक निर्माण झाल्याने विद्युत विभागाची कोंडी झाली आहे. त्यात परिवहन व विद्युत विभागाचा गाडा हाकणारे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कर्मचाऱ्यांचीही कमतरता निर्माण होऊ लागली आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची देणी प्रलंबित
सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन, ग्रॅच्युईटीसह अन्य लाभ कर्मचाऱ्यांना मिळतात, मात्र बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅच्युईटीसह अन्य लाभ मिळवण्यासाठी उपक्रमाचा उंबरठा झिजवावा लागत आहे. सद्यस्थितीत बेस्टकडे शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 578 कोटी 98 लाखांची देणी प्रलंबित आहेत.