विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून

गेले चार आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. राज्य विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू होईल, अशी  घोषणा यावेळी  दोन्ही सभागृहांत करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर केले. 3 मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात 10 मार्च रोजी राज्याचा सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अधिवेशनात एकूण  16 दिवस कामकाज चालले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्टय़ ठरले. याच अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.