पुढचे उपोषण मुंबईत, मनोज जरांगे यांची घोषणा

सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असे म्हणत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. पुढचे सामूहिक उपोषण मुंबईत करणार अशी घोषणाही त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी ते बोलत होते.

जरांगे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात आहेत. पंढरपूर येथे जात असताना आज त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी येथून पुढील आंदोलन मुंबई येथे होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. सरकार कुणाचे ही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, आरक्षणाची चळवळ काही थांबणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान जरांगे यांनी मराठा, मुस्लिम, दलितांचे राजकीय समीकरण जुळवून उमेदवार देण्याचे ठरवले होते. परंतु या तिघांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे समीकरण अस्तित्वात आले नाही. मराठा बरोबर मुस्लिम दलित एकत्र आले तर अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात म्हणून समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते जुळले नसल्याने ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती.