चौथ्या दिवशी सरफराज खान आणि ऋषभ पंतच्या संघर्षपूर्ण फलंदाजीने हिंदुस्थान क्रिकेटप्रेमींच्या मनात आशेचे किरण पेटवले होते. पण न्यूझीलंडच्या नव्या चेंडूंच्या हल्ल्याने त्या प्रयत्नांवर अक्षरशः बुलडोझर फिरवला. हिंदुस्थानचे 7 फलंदाज अवघ्या 54 धावांत ढेपाळल्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयाचा आलिंगन घालण्यासाठी अवघ्या 107 धावांची गरज होती. चौथ्या दिवशी केलेला संघर्ष पाचव्या दिवशीही अनुभवायला मिळेल. गोलंदाज चमत्कार करतील, अशी आशा होती. पण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात सहज सामना जिंकला. तब्बल 36 वर्षांनंतर हिंदुस्थानला मायभूमीत हरवण्याचा पराक्रम न्यूझीलंडला करता आला तर हिंदुस्थानी संघ कोणताही चमत्कार, कोणताही संघर्ष न करता कसोटी सामना हरले. त्यामुळे यजमान हिंदुस्थान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडला आहे.
सरफराज खान आणि ऋषभ पंतने शनिवारी कसोटीच्या चौथ्या दिवशी चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागी रचून हिंदुस्थानी संघाच्या मनात विजयाची आशा निर्माण केली होती, पण 81 व्या षटकांत घेतलेल्या नव्या चेंडूने हिंदुस्थानी फलंदाजांच्या पोटात अक्षरशः गोळा आणला. कसोटीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न नव्या चेंडूने हाणून पाडला. सरफराज-पंतनंतर नव्या चेंडूचा हल्ला इतका घातक होता की, हिंदुस्थानची मधली फळी अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि हिंदुस्थानचे विजयाचे स्वप्न हवेतच विरून गेले.
रचिनने संधीच दिली नाही
न्यूझीलंडला 107 धावांचे माफक लक्ष्य गाठायचे होते. खेळावर पावसाचे सावट होते, पण पाऊण तास उशिराने सामना सुरू होणार असल्याचे कळताच न्यूझीलंडने सुटकेचा निःश्वास सोडला. फलंदाजीला येताच न्यूझीलंड हिंदुस्थानच्या गोलंदाजीवर तुटून पडत वेगात धावा करणार, याची कल्पना होती. दुसरीकडे हिंदुस्थानी गोलंदाजांना धडाधड विकेट काढण्यावाचून पर्याय नव्हता. जसप्रीत बुमराने दिवसाच्या दुसर्याच चेंडूवर कर्णधार टॉम लॅथमची विकेट काढत सनसनाटी निर्माण केली. शून्यावरच पहिली विकेट मिळाल्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांमध्ये चैतन्य संचारले होते. त्यानंतर बुमराने काही भन्नाट चेंडू टाकले तरी पहिल्या डावात 91 धावांची खेळी करणाऱ्या डेव्हन कॉन्वेने विल यंगसह तासाभर किल्ला लढवला. तेव्हा बुमराने कॉन्वेला बाद करून आणखी एक यश मिळवले. पण त्यानंतर विल यंग आणि रचिन रवींद्रने बुमरा-सिराजच्या माऱ्याला सहज थोपवत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांनंतर आपल्या तिन्ही फिरकीवीरांनाही आणले, पण यंग-रवींद्रने हिंदुस्थानी गोलंदाजांना कोणतीही संधी निर्माण करूच दिली. यंग 48 तर रचिन 39 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात 134 धावांची तडाखेबंद खेळी करणारा रचिन रवींद्र ‘सामनावीर’ ठरला.
36 वर्षे आणि 19 कसोटी…
अखेर न्यूझीलंड हिंदुस्थानात तब्बल 19 कसोटी आणि 36 वर्षांनंतर हिंदुस्थानी संघाला हरविण्याची किमया साधली. बरोबर 36 वर्षे आणि एक महिन्यापूर्वी वानखेडेवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 136 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर न्यूझीलंड तब्बल 19 कसोटी खेळले, पण त्यांना एकाही कसोटीत हिंदुस्थानी संघाला नमवता आले नव्हते. यात ते 10 कसोटी हरले तर 9 कसोटी अनिर्णितावस्थेत राहिल्या होत्या. एवढेच नव्हे तर 2010 ते 2016 दरम्यान सलग सहा कसोटी सामन्यांत हिंदुस्थानकडून त्यांना दारुण पराभवांची झळही सोसावी लागली होती. अखेर ती मालिका खंडित करण्यात त्यांना साडेतीन दशकांनंतर यश लाभले.
पहिल्या पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध विजयाचा चौकार ठोकला होता… – शर्मा
आम्ही या पराभवाला विसरून पुण्याला पोहोचणार. आम्ही इंग्लंडविरुद्धही पहिली कसोटी गमावल्यानंतर सलग चार कसोटी जिंकलो होतो. आमच्या प्रत्येक खेळाडूला काय करायचेय याची आम्हाला जाणीव आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेण्यात चूक झाली. आमचा संघ 46 धावांत बाद होईल, याचा कधी विचारही केला नव्हता, असे रोहित शर्मा म्हणाला.
हिंदुस्थान प्रतिहल्ला करणार – लॅथम
आम्ही बंगळुरू जिंकले असले तरी आम्हाला पुणे कसोटीवर आपले लक्ष पेंद्रित करायला हवे. कारण हिंदुस्थान संघ आता आमच्यावर प्रतिहल्ला करणार आणि ती त्यांची ताकद आहे. 36 वर्षांनंतर हिंदुस्थानला त्यांच्या घरात आम्ही हरवले आहे. ही आमच्यासाठी नक्कीच गौरवाची कामगिरी आहे. याचा आम्ही जल्लोष करणार. आमच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय ओ’रोर्क, हेन्री आणि साऊदी यांच्या वेगवान गोलंदाजीला जाते, असे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम म्हणाला.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदरही संघात
पहिल्या कसोटीतील पराभवामुळे हिंदुस्थानी निवड समितीने 15 सदस्यीय संघ 16 सदस्यीय करताना अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित दोन्ही कसोटींसाठी तो हिंदुस्थानी संघासोबत असेल. सध्या वॉशिंग्टन दिल्लीविरुद्ध रणजी सामना खेळत असून त्याने यात पहिल्या डावात 152 धावांची खणखणीत खेळीही साकारली होती. तसेच 2 विकेटसुद्धा टिपले होते. मात्र हा सामना उद्या संपल्यानंतर तो पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी संघासोबत असेल.
2021 मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो केवळ चारच कसोटी सामने खेळू शकला आहे. यात त्याने 265 धावा तर 6 विकेटसुद्धा टिपले आहेत. सध्या हिंदुस्थानी संघात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा हे दोन अष्टपैलू फिरकीवीर आहेत. तसेच कुलदीप यादव हा फिरकीवीर असतानासुद्धा वॉशिंग्टनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तो नक्कीच कुलदीप यादवची जागा घेणार असे चित्र सध्या दिसतेय. येत्या 24 ऑक्टोबरपासून दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला जाणार आहे.
हिंदुस्थानचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.