दिवंगत उद्योजक, थोर समाजसेवक रतन टाटा यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विभाग, लोअर परळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी श्रमिक जिमखाना येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 1,841 जणांनी रक्तदान केले. देशभरात रक्तदानाविषयी जनजागृती करत फिरणारे दिव्यांग प्रकाश नाडर यांनीही येथे रक्तदान केले. त्यांचा या वेळी आयोजकांमार्फत सत्कार करण्यात आला.
रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची चणचण असल्याने अनेक गंभीर शस्त्रक्रिया व उपचार यांना विलंब होत होता. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवला जात आहे. यंदाही या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात स्थानिकांसोबतच मुंबई ठाण्यातील उपनगरांमधील रक्तदात्यांनी हजेरी लावली. या वेळी वृत्तपत्र विव्रेता संघाच्या सदस्यांनी तसेच 125 महिलांनी रक्तदान केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तिरुपती को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नीलेश मानकर, सतीश वाघ फाऊंडेशन, लोकशांती को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील, महावीर इंटरनॅशनल ट्रस्ट मुंबई, एचडीएफसी बँक, लायन्स क्लब, समाजसेविका संगीता गाडे, उद्योजक सतीश पाटील, संतोष वर्टेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवला जात आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढता असल्याचे समाधान बृन्हमुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी व्यक्त केले, तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व सदस्यांचे आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र देसाई, सचिव कृष्णा पाटील यांनी मानले.
या उपक्रमाला बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार सुनील शिंदे, आमदार शिवाजी पाटील, माजी महापौर किशोरी पेडणेकर व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे संजय चौकेकर, रवींद्र चिले, बाळा पवार, अजय उतेकर, प्रकाश गिलबिले आदींनी भेट दिली.