जुळ्यांचा पुश-अपचा ’वर्ल्ड रेकॉर्ड’
हविश आणि हर्षिल धर्मेश वाडिया या दोन जुळ्या मुलांनी एका तासात जोडय़ांमध्ये जास्तीत जास्त हिंदू पुश-अप करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. या मुलांनी एका तासात 1,239 हिंदू पुश-अप पूर्ण केले. वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड्समधून अधिकृत मान्यता मिळवून या दोघांनी रोज अर्धा ते एक तास व्यायामाचा सराव करून उल्लेखनीय कामगिरी केली. राष्ट्रीय विजेत्या परिता गोस्वामी आणि सुवर्णपदक विजेता आयुष पंडारी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
राष्ट्राध्यक्षपदाचे ट्रम्प उमेदवार
रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले. हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी रात्री मिल्वॉकी शहरात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांना 2387 प्रतिनिधींची मते मिळाली. उमेदवार निवडण्यासाठी 1215 मतांची आवश्यकता आहे. त्यानंतर पक्षाने ट्रम्प यांचे नाव राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी 39 वर्षीय जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
स्विगी, झोमॅटोवर दारूची होम डिलिव्हरी
स्विगी, झोमॅटो आणि बिगाबास्केट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दारूची होम डिलिव्हरी केली जाऊ शकते. नवी दिल्लीसह सहा राज्यांत हा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार आहे. येत्या काही महिन्यांत ही सर्विस सुरू होईल असा अंदाज आहे. सुरुवातीला कमी अल्कोहोल असलेले ड्रिंक्स म्हणजे बियर, वाईन आणि लिकर यांची डिलिव्हरी होईल. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सुप्रीम कोर्टाला मिळाले दोन नवे न्यायाधीश
न्यायाधीश एन. कोटीश्वर सिंग आणि न्यायाधीश आर महादेवन हे दोन नवीन न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाला मिळाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दोन न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली, अशी माहिती कायदेमंत्री अर्जून राम मेघवाल यांनी मंगळवारी याची घोषणा केली.
देशातील पहिले हायड्रोजन जहाज काशीत
देशातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज वाराणसीत दाखल झाले. हे जहाज कुंभमेळ्यात काशी ते प्रयागराज यादरम्यान चालवण्यात येणार आहे. हे जहाज काशीतील एकूण 84 घाटांपैकी शेवटच्या नमो घाटावर उभे करण्यात येणार आहे. तेथून पुढे ते बनारस टर्मिनल (रामनगर) येथे नेले जाईल.
ओमानच्या मशिदीत गोळीबार, 4 जण ठार
ओमानमधील मशिदीजवळ झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ओमानची राजधानी मस्कत येथील वाडी अल-कबीर मशिदीजवळ ही घटना घडली. हल्ला झाला त्या वेळी मशिदीमध्ये शिया धर्मीयांची एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता.
रॉबर्ट रवी बीएसएनएलचे नवे एमडी
सरकारी टेलिकॉम पंपनी बीएसएनएलचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून रॉबर्ट रवी यांची नियुक्ती करण्यात आली. रवी यांच्यावर डुबणाऱया बीएसएनएलला सावरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रॉबर्ट रवी यांनी 15 जुलै 2024 पासून पदभार स्वीकारला आहे.